‘चोर चोर’ ओरडून सराफाला लुटले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

४३ लाखांचे दागिने पॉलिश करण्यासाठी कारखान्यात घेऊन निघालेल्या कर्मचाऱ्याला दहिसर रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यात अडवून त्याला ‘चोर चोर’ असे बोलून चार आरोपी त्याच्याकडील दागिन्यांची बॅग हिसकावून पळाले पण एमएचबी पोलिसांनी कोणताही क्ल्यू नसताना ४८ तासांत चोराच्या उलटय़ा बोंबा मारून गुन्हा केलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले.

लाल बाबू शेख (२०) हा तरुण सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या कारखान्याचे काम करतो. १८ जुलैला दहिसर येथील शहा यांचे १४०५ ग्रॅम वजनाचे व ४३ लाख किमतीच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या सोन्याच्या ७० बांगडय़ा पॉलिश करण्यासाठी शेख कारखान्याकडे घेऊन चालला होता त्यावेळी ही घटना घडली. सोन्याच्या बांगडय़ा असलेली शेखजवळची बॅग हिसकावून आरोपींनी पळ काढला. शेखने याबाबत मालकाला सांगून एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर व अन्य पथकाने ४८ तासांत त्या चोरांना गजाआड केले.