
सामना प्रतिनिधी, हिंगोली
मराठा क्रांती ठोक मोर्च्याला हिंगोली जिल्ह्यात हिंसक वळण लागले असून काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्युचे संतप्त पडसाद आज म्हटले आहेत. हिंगोली ते नांदेड रस्त्यावरील खानापूर चित्ता या गावाजवळ सुरू असलेल्या रास्ता रोको दरम्यान संतप्त आंदोलकांनी पोलिसांचे वाहन पेटवून दिल्याची घटना घडली. तर वसमत येथे मोठ्यात दगडफेक करण्यात आली.
मराठा क्रांती ठोक मोर्चेकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यामध्ये हिंगोली शहरासह जिल्हाभरातील मराठा समाज बांधव सहभागी झाले. शहरात गांधी चौकामध्ये एकत्र येऊन धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रॅली काढून सुरू असलेली काही दुकाने बंद करण्याचे आवाहन आंदोलकांनी केले. हिंगोली शहरात बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला.
जिल्ह्यातील वसमत या तालुक्याच्या ठिकाणी मोंढ्यात पारस जैन यांच्या दुकानावर तसेच सहस्त्र अर्जुन सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयासह अन्य एका दुकानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी दगडफेक केली. वसमत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच वसमत तालुक्यातील हट्टा येथे बाजारपेठ बंद ठेवून परभणी ते औंढा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला आहे. यासोबतच आसेगाव येथे देखील परभणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हिंगोली तालुक्यातील सावरखेडा, खानापूर चित्ता याठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. खानापूर चित्ता येथे आंदोलन सुरू असतानाच एम एच ३८- १८४ या क्रमांकाच्या पोलीस जीप वर पेट्रोलचा गोळा टाकून पोलिसांचे वाहन पेटवण्यात आले. या वाहनांमध्ये पोलीस चालक कांबळे हे बसले होते. जीपने पेट घेतल्याचे वेळीच लक्षात आल्यावर कांबळे यांनी वाहनातून उडी घेतल्यामुळे त्यांचा जीव बचावला.
हे वाहन कळमनुरी पोलीस ठाण्याचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. कळमनुरी, आखाडा बाळापुर, शेवाळा, वारंगा फाटा, सेनगाव , औंढा नागनाथ, जवळाबाजार यासह जिल्ह्यात ठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. हिंगोली शहराजवळील बनसोड बायपास येथेदेखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

























































