आंदोलन चिघळण्यास मुख्यमंत्री, मंत्र्यांची चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या मराठा ठोक आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतले. यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक करण्यात आली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आंदोलनाबाबत एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी आंदोलन चिघळण्यास मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना जबाबदार धरले आहे.

मराठा समाजातील वंचित तरुणांनी आजपर्यंत कायदा सुव्यवस्था हातात न घेता शांततेच्या मार्गाने आरक्षणासह आपल्या इतर मागण्या मांडल्या. त्यांच्या अस्वस्थतेची दखल न घेतली गेल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला गेला. सरकारकडून त्याचीही दखल घेतली न गेल्याने उद्रेकाची स्थिती निर्माण झाली, असे शरद पवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

आतापर्यंत तरुणांना शांततेच्या मार्गाने त्यांच्या मागण्यांना वाचा फोडण्याचा मार्ग अवलंबिला होता परंतु आम्ही सगळे काही केलेले आहे अशी विधाने मंत्र्यांकडून व विशेषत: चंद्रकात पाटील यांनी केल्यामुळे तरुणांमध्ये व समाजात त्याबद्दल संतापाचे वातावरण आहे. याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पावले उचलण्याची आवश्यकता होती. परंतु विठ्ठल पूजेच्या निमित्ताने वारकऱ्यांना त्रास होईल अशी साप सोडण्याची विधान त्यांनी केली. यात चंद्रकांत पाटील यांच्या बेजबाबदार विधानांची भर पडली व मराठा समाजाचा संताप अनावर झाला. परिस्थिती चिघळण्यासाठी ही मंडळीच जबाबदार आहे असे पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच ही परिस्थिती वेळीच आटोक्यात राखण्याच्या दृष्टीने राज्यसरकारने आंदोलनात सहभागी महत्त्वाच्या घटकांना त्वरित बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा व यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळावे व सर्वसामान्यांना या आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारीही घ्यावी. या आंदोलनाला आजवर सर्वसामान्यांची असलेली सहानुभूती आंदोलनकर्त्यांनी टिकवून ठेवावी, असेही पवार यांनी निवेदनात म्हटले.