
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी आणि लोअर परळ स्थानकादरम्यान रुळांची देखभाल करणाऱया एका गँगमनला लोकलच्या दारात उभ्या राहणाऱया प्रवाशाने लाथ मारल्याने त्याला लोकलचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.
लोअर परळ गँग नंबर-५ चे गँगमन श्रवण लक्ष्मण सानप (४०) हे रुळांची डागडुजी करण्याचे काम करीत होते. सकाळी नऊच्या सुमारास चर्चगेटला जाणाऱया अप धीम्या लोकलमधील एका प्रवाशाने पाठमोऱया असलेल्या सानप यांना मागून लाथ मारली. त्यामुळे बेसावध असलेले सानप पुन्हा लोकलवरच पडले. त्यामुळे लोकलच्या दरवाजाखालील पायऱयांचा फटका लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांच्या इतर साथीदारांनी महालक्ष्मी स्थानकातील १०८ अॅम्ब्युलन्सद्वारे दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या अॅम्ब्युलन्सचा चालकच जागेवर नव्हता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तसेच या अॅम्ब्युलन्समध्ये तातडीने उपचार करण्याचे कोणतेही साहित्य नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जखमी सानप यांना टॅक्सीमध्ये टाकून कसे तरी नायर रुग्णालयात नेण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्या मुलाने लाथ मारली तो लोकलच्या तिसऱ्या डब्यातून प्रवास करीत होता. जर अॅम्ब्युलन्समध्ये तातडीच्या उपचाराची सोय असती तर कदाचित सानप यांचे प्राण वाचले असते, असे वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले.

























































