
जे.डी. पराडकर । संगमेश्वर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संगमेश्वर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने बुधवारी तालुका बंदची हाक देण्यात आली होती. संगमेश्वर, देवरूखसह साखरपा परिसरात कडकडीत बंद ठेवून बंद यशस्वी करण्यात आला. मराठा समाजाच्यावतीने देवरूखात मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. तालुक्यात बंद सर्वत्र शांततेत पार पडला. रिक्षा आणि एस.टी. सेवाही संध्याकाळपर्यंत बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
राज्यभर मराठा आरक्षणासाठी बंद आणि मोर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील मराठा बांधवांनी क्षत्रिय मराठा समाज संघटनेच्या वतीने तालुका बंदची हाक दिली होती. याचे निरोप वार्यासारखे पसरले, शिवाय सोशल मीडियावरूनही तालुका बंदची हाक सर्वत्र पोहचली यामुळेच देवरूख, साखरपा, संगमेश्वर बाजारपेठा आज उघडल्याच नाहीत. तीनही ठिकाणी व्यापार्यांनी १०० टक्के बंद पाळत मराठा बांधवांना आपला पाठींबा दर्शवला. तालुक्यातील माखजन, आरवली, कसबा, फणसवणे, कोसुंब, साडवली, सह्याद्रीनगरसह अन्य ग्रामीण भागातही बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
आजच्या बंदला देवरूख आणि संगमेश्वरातील रिक्षा संघटनांनीही पाठींबा दिला परिणामी प्रवाशांचे हाल झाले. सकाळी १० पर्यंत एस.टी. सेवा सुरू होती त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार देवरूख आगाराने संगमेश्वर, साखरपा, माखजन बसस्थानकावरील वाहतूक बंद केली. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात याठिकाणाहून एकही बसफेरी सुटली नाही. याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसला. असंख्य प्रवासी ठिकठिकाणी बसस्थानकात ताटकळत होते.
बंदच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वरात पोलिस निरीक्षक श्री झावरे तर देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई – गोवा महामार्ग, देवरूख बाजारपेठ, साखरपा बाजारपेठ आणि रत्नागिरी – कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभरात तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.






























































