
>> रतींद्र नाईक, [email protected]
संततधार पडणारा पाऊस, दुथडी भरून वाहणाऱया नद्या आणि दाट धुक्याने झाकोळून गेलेला प्रदेश अशा वातावरणात आपल्यातले साहस दाखवत अनेक ट्रेकर्स डोंगर, गडकिल्ले पालथे घालतात. अशा वेळी त्यांच्यासोबत असतो तो त्यांचा विश्वास, धाडस आणि ध्येय. महाराष्ट्रात अनेक अशी उंच ठिकाणे आहेत जिथे पावसाळय़ात पोहोचल्यावर तुम्हाला जणू एखादे शिखर सर केल्याचा आनंद मिळेल. बिकट परिस्थितीत खडतर प्रवासाचा अनुभव देणाऱया व आपल्यातील जिद्द दाखवून देणाऱया या ‘अॅडव्हेंचर्स’ ठिकाणांची चला तर माहिती घेऊया.
पावसाळय़ात निसर्गाला वेगळाच बहर येतो. संततधार कोसळणाऱया जलधारा व हिरवागार निसर्ग ट्रेकर्सना भटकण्यासाठी आकर्षित करत असतो. काही गिरीप्रेमी गडकिल्ले गाठतात तर काही ट्रेकर्सची पावले डोंगरदऱयांच्या दिशेने वळतात; परंतु राज्यात अशीही काही उंच ठिकाणे आहेत जिथे सहजासहजी पोहोचता येत नाही. जिद्द, ध्येय आणि कसोटीतूनच अशा स्थळी पोहोचता येते. असे असतानाही काही ट्रेकर्स अशा ठिकाणांच्या शोधात असतात. अरुंद वाट, वेगाने वाहणारे पावसाचे पाणी, निसरडे रस्ते आणि रस्ता चुकवणाऱया वाटा याचा सामना धो धो पडणाऱया पावसात ट्रेकर्सना करावा लागतो.
ढाक भैरी
लोणावळय़ाजवळच जांभिवली गाव असून या गावातून डाक भैरीच्या ट्रेकिंगसाठी चढाई करावी लागते. मुंबई-पुण्यातील ट्रेकर्ससाठी ढाक भैरीजवळचे ट्रेकिंग डेस्टीनेशन आहे. ढाक हे गडाचे नाव असून गडावर भैरवनाथचे मंदिर आहे. दोन तासांच्या जंगल प्रवासानंतर खऱया अर्थाने गड चढाईला सुरुवात होते. गडाच्या दिशेने जाताना अक्षरशः निमुळत्या खडकावरून तोल सावरत चालावे लागते. चालताना जरा जरी तोल गेला तर माणूस दरीत पडून दगावण्याची शक्यता आहे. शिवाय काही ठिकाणी तर रश्शी आणि बांबूचा आधार घेऊनच पुढे जावे लागते. त्याशिवाय पर्याय नाही. पावसात तर कठीण परिस्थितीत आणखीच भर पडते. त्यामुळे ट्रेकिंगला या ठिकाणी जाताना ट्रेकर्सनी विशेष काळजी घ्यावी.
साल्हेरचा किल्ला
राज्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून साल्हेरचा किल्ला ओळखला जातो. पावसाळय़ात या किल्ल्याला एक वेगळाच रुबाब प्राप्त होतो. पायथ्यापासून या किल्ल्यावर जाण्यासाठी गिरीप्रेमींना तीन तास लागतात. अरुंद वाट, त्याभोवती वाढलेले गवत आणि या गवतात स्वच्छंदपणे विहार करणारे सर्प, विंचू यांच्यावर लक्ष ठेवत चढाई करावी लागते. गडावर चढण्यासाठी काही ठिकाणी पायऱया आहेत; परंतु त्याही तुटलेल्या अवस्थेत असून खडकाळ प्रदेशातून सांभाळून चालावे लागते. काही ठिकाणी खडकाचा अंदाज घेऊन पाऊल टाकावे लागते. एकदा का या गडावर पोहोचलात की उंचावरून दिसणारा हिरवळ प्रदेश आणि तेथून वाहणारे ढग हे विहंगम दृश्य डोळय़ात साठवून ठेवावेसे वाटते. गड जसा चढताना अवघड वाटतो तसाच उतरतानाही ट्रेकर्सना विशेष काळजी घ्यावी लागते. हा किल्ला नाशिक जिल्हय़ातल्या बागलाण भागात असून पाच हजार एकशे चाळीस इतकी या गडाची सुमद्रसपाटीपासून उंची आहे.
हरीहर गड
इगतपुरी-त्र्यंबक भागात हरी रहर गड वसला असून या गडाच्या टोकावर पोहोचणे हे गिरीप्रेमींसाठी आव्हान ठरते. खोल दरी आणि उंच दगड त्यातून जाणारी निमुळती वाट पाहून ट्रेकर्सना येथून मार्गक्रमन करावे लागते. शिवाय पायथ्याजवळ असलेल्या जंगलातील झुडुपांमुळे रस्ता चुकण्याची शक्यता जास्त असते. पावसाळय़ात खडकांवर शेवाळ उगवल्याने घसरून पडण्याचा धोका जास्त असतो.
वासोटा- व्याघ्रगड
साताऱयातील दुर्गम भागात वासोटा-व्याघ्रगड उभा आहे. वासोटा किल्ला ट्रेकर्सना साहसाची अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे हा भाग जंगल आणि वन्य जीवांनी समृद्ध आहे. कोयना धरण पार करून वासोटा किल्ला गाठता येतो पण त्याआधी वनविभागाची परवानगी आवश्यक असते. 4267 फूट या किल्ल्याची उंची असून घनदाट अरण्यातून जाताना पायाला जळू चिकटण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय काटेरी झुडपातून ट्रेकर्सना मार्गक्रमण करावे लागते. एकदा का गडावर पोहोचलात की ट्रेकर्सना तेथील सृष्टीसौंदर्य पाहून गड सर केल्याचा वेगळाच आनंद मिळतो.
ट्रेकला निघताना काय काळजी घ्याल
– कुठल्याही ट्रेकला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, ट्रेकची, त्याच्या वाटा-चढाईची परिपूर्ण माहिती घ्यावी.
– अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक, माहिती पुस्तक सोबत हवेत. पाऊस, ढग, दाट धुके, वारा यामध्ये बऱयाचदा रस्ता चुकण्याचा धोका असतो. याचीही ट्रेकर्सनी
काळजी घ्यावी.
– ट्रेकिंगच्या वेळी धबधब्याजवळ भिजण्याचा मोह टाळावा. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते.
– अशा आडवाटेवरचे ट्रेक करताना आपल्याबरोबर दोरी, टॉर्च, काडेपेटी, मेणबत्ती, पॅकफूड, मोबाईल सोबत पावरबँक आणि नाव पत्ता संपर्क क्रमांक, रक्तगट असलेले ओळखपत्र घेण्यास विसरू नये.























































