मुळा धरणाचा पाणी साठा ५९ टक्के 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । राहुरी

राहुरीच्या मुळा धरणाचा आज सायंकाळ पर्यंतचा पाणीसाठा १५ हजार २१५ दशलक्ष घनफुट झाल्याने धरण ५९ टक्के भरले आहे. नगर जिल्ह्याची कृषी पंढरी म्हणुन राहुरीच्या मुळा धरणाची संपुर्ण राज्यात ओळख आहे. १० लाख लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच मुळा उजवा व डावा कालव्याच्या राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या चार तालुक्याच्या लाभक्षेत्रातील १ लाख हेक्टर कृषी सिंचन धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने १५ ऑगस्ट पुर्वीच मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी लाभक्षेत्राबरोबरच मुळ पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने २६ हजार दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेले मुळाधरण १५ ऑगस्ट पुर्वी भरेल की नाही याकडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. घाटमाथ्यावर पावसाच्या रिमझिम सरी पडत असल्याने धरणात नव्याने दाखल होणार्‍या पाण्याची आवक कमी झाली आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजता अवघी ३ हजार २१२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा पाणीसाठा १५ हजार २१५ दशलक्ष घनफुट तर पाण्याची पातळी १७८९.९० फूट झाली आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणातील पाणीसाठ्याची १६ हजार ४९९ दशलक्ष घनफुट तर पाण्याची पातळी १७९३.५ फूट झाली होती. मागील वर्षी घाटमाथ्यावर दमदार पाऊस सुरु असल्याने मुळा धरणात ८ हजार ३७३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.