इम्रान खान पंतप्रधान होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान याच्या ‘तहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाला अखेर सत्तेची ‘लॉटरी’ लागली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत नॅशनल असेंब्लीच्या सर्वाधिक ११९ जागा या पक्षाने जिंकल्यामुळे इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या तख्तावर विराजमान होणार हे आता निश्चित झाले आहे.

पाकिस्तानला हिंदुस्थानशी संबंध सुधारायचे आहेत. मात्र त्या देशाच्या नेतृत्वाचीही तशी इच्छा असली पाहिजे. ते एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावले पुढे येऊ. कश्मीरचा प्रश्न हा दोन्ही राष्ट्रांमधील महत्त्वाचा मुद्दा असून तो चर्चेद्वारेच सुटला पाहिजे – इम्रान खान

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३४२ जागा असून त्यापैकी २७२ जागांसाठी मतदान झाले होते. बहुमतासाठी १३७ जागा जिंकणे आवश्यक असून इम्रान खान याला जेमतेम १८ जागांचीच कमतरता भासणार आहे.

या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाला ६३ जागा मिळण्याच्या मार्गावर आहेत. बिलावल भुत्तो यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला अवघ्या ३७ जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसते. तर ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ या पक्षाला ८ तर ‘मुत्ताहिदा मजलीस-ए-अमल’ या पक्षालाही ८ जागा मिळाल्या आहेत.

हाफीज सईदला नाकारले
मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टर माइंड’ हाफीज सईद याला पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत तेथील जनतेने साफ नाकारले आहे. एकही जागा जिंकू न शकल्याने त्याच्या हाती भोपळा आला आहे.

हाफीज सईद याने ‘अल्लाहु अकबर तहरिक’ या पक्षातर्फे लोकसभेसाठी (नॅशनल असेंब्ली) ५० तर विधानसभांसाठी (प्रांतीय असेंब्ली) १५० उमेदवार रिंगणात उतरवले होते. उमेदवारांमध्ये हाफीजचा मुलगा आणि जावयाचाही समावेश होता; पण त्याचा एकही उमेदवार निवडून न आल्याने ‘अल्लाहु अकबर तहरिक’ या पक्षाचा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला आहे.