
राजकुमार भगत । न्हावाशेवा
दोन महिन्यांपासून समुद्रापासून दुर असलेल्या दर्याचा राजा म्हणजेच कोळी बांधवांची समुद्रात जाण्याच्या प्रतीक्षा आता संपली असून १ ऑगस्ट पासून मच्छिमारांच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी झेपावणार आहेत.
जून-जूलै हा महिना माश्यांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा कालावधी असतो. तसेच या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे १ जून ते १ ऑगस्ट या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते. मच्छिमार बांधव देखील या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. बंदीच्या कालावधीत कोळी बांधवांनी आपली ही कामे पुर्ण केली असून आता मासे मारी करायला तयार झाले आहेत. यंदापासून देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातल्या बंदी कालावधीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला होता. हा बंदीचा कालावधी संपत आला असून १ ऑगस्टपासून या मच्छिमारी नौका पुन्हा एकदा खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत.

























































