
सामना ऑनलाईन । मुंबई
आयआयटीच्या तज्ञांनी धोकादायक ठरविल्याने पश्चिम रेल्वेने लोअर परळचा पूल बंद केल्याने करी रोडहून फिनिक्स मिलच्या दिशेने पूर्व ते पश्चिम जाणाऱ्या पादचाऱ्यांची कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर शिवसेनेने या पुलाचा रॅम्प पादचाऱ्यांसाठी उघडा करण्याची मागणी केली होती. पालिका, रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर गुरुवारी करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानकापर्यंतचा भाग पुन्हा पादचाऱ्यांसाठी उघडा करण्याचे ठरले. परंतु पुलाच्या रस्त्यावर या भागात वाहने शिरू नयेत यासाठी वाहतूक शाखेच्या मदतीने पालिकेने तेथे स्टीलचे खांब रोवले होते. त्याचे सिमेंट सुकून ते मजबूत होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने आता पादचाऱ्यांना हा मार्ग उद्या, शनिवारी खुला करून देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.




























































