
सामना ऑनलाईन । मुंबई
येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी असून त्यानिमित्त प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱया लाखो भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने जोरदार तयारी केली आहे. महिला आणि पुरुष भाविकांसाठी वेगळी रांग, अपंग आणि गरोदर महिलांसाठी वेगळी रांग, मोफत बससेवा इत्यादी सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.
उद्या मध्यरात्री दीड वाजल्यापासून ते पहाटे सवातीन वाजेपर्यंत, मंगळवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत तर रात्री ९ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजेपर्यंत भाविकांना श्रींचे दर्शन घेता येईल. न्यासातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांसाठी ३० जुलै रोजी मध्यरात्री १२ ते ३१ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत केशवसुत उड्डाणपूल, दादर रेल्वे स्थानक ते रवींद्र नाटय़मंदिर (सहा बेस्ट बसेस) आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक ते रवींद्र नाटय़मंदिर (एक बेस्ट बस) यादरम्यान मोफत बससेवा देण्यात येईल. दरम्यान, श्रींच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमामावर होणारी गर्दी विचारात घेता सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना मौल्यवान वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.























































