
सामना प्रतिनिधी । पोलादपूर/महाड
पोलादपूर- जवळच्या आंबेनळी घाटात आज मृत्यूने अक्षरशः तांडव घातले. दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ३४ कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरला सहलीला घेऊन निघालेली मिनी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱयावरून घसरली आणि चालकाचा ताबा सुटल्याने थेट आंबेनळी घाटात ८०० फूट दरीत कोसळली. खडकांवर आपटत बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि मृतदेह छिन्नविच्छिन्न होऊन दरीत इतस्ततः विखुरले. ही दुर्दैवी घटना आज सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान दाभळी-टोक या गावाजवळ घडली. पोलीस, गिर्यारोहक पथक, एनडीआरएफ टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत १८ मृतदेह दरीतून बाहेर काढले असून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
दरवर्षी भात लावणीचा मोसम संपला की त्यानंतर दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीला जातात. या वर्षी त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठातील गहू संशोधन केंद्रात पाहणीसाठी जाण्याची परवानगी विद्यापीठाकडे मागितली. अर्जावर एकूण ४० जणांची नावे व स्वाक्षऱया होत्या, परंतु ३२ कर्मचारीच सहलीसाठी निघाले. सोबत दोन चालकही होते. सकाळी ६.३० वाजता त्यांची बस कृषी विद्यापीठातून निघाली.
काळ आला.. पण वेळ आली नव्हती..
या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हेही होते. चालकाचा ताबा सुटून बस दरीमध्ये कोसळणार याची चाहूल सावंत यांना लागली आणि त्यांनी मागच्या खिडकीतून बाहेर उडी मारली. तेही दरीत घरंगळत.. आपटत कोसळले आणि एका झाडाला जाऊन अडकले. त्या अवस्थेत झाडे, वेली आणि कपारीच्या आधाराने कसेबसे वर आले. त्यांना पाहताच धबधब्याजवळ आंघोळ करणारे तरुण धावत पुढे आले आणि त्यांना आधार दिला. त्यापैकी एका तरुणाच्या मोबाईलवरून त्यांनी कृषी विद्यापीठ आणि दापोली पोलिसांना ही घटना कळवली. त्यानंतर हा अपघात झाल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल झाले. या भयंकर घटनेत कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याचे कळताच कोकण कृषी विद्यापीठ हादरून गेले. रत्नागिरी जिल्ह्यात उत्स्फूर्त बंद पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त झाली.
रोशनचे झाले होते ६ महिन्यांपूर्वी लग्न
रोशन तबिब, किशोर चोगले, जयेंद्र चोगले हे दापोलीत हर्णे येथील तिघेही या अपघातात मृत्यू पावले आहेत. हे तिघेही कृषी विद्यापीठात कामाला होते. रोशन तबिब याचे ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. रोशनची बहीण रेश्मा ही सुद्धा कृषी विद्यापीठात नोकरी करीत आहे. मात्र ती सहलीला गेली नव्हती. रोशनच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
– किशोर चोगले याचे वडील पी. एन. चोगले हे हर्णेमधील पाज फिशिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष आहेत. हर्णे मधील हे तीन तरुण अपघातात मृत्यू पावले असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मी वाचलो, पण माझे सहकारी...
या भयंकर अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलेले प्रकाश सावंत-देसाई अजूनही सावरलेले नाहीत. मी या अपघातातून वाचलो.. पण माझे सहकारी.. असं सांगताना सावंत-देसाई यांच्या अश्रूंचा बांध फुटला
चालकाने मागे वळून पाहिले आणि ताबा सुटला
पोलादपूर सोडल्यानंतर आंबेनळी घाटमार्गे ते महाबळेश्वरच्या दिशेने निघाले. घाटात प्रचंड धुके होते. गाडीत गप्पा, गाणी आणि हास्यविनोद सुरू होते. पोलादपूरपासून साधारण २२ किलोमीटर अंतर पुढे आल्यावर दाभळीटोक गावाजवळ चालकाने हास्यविनोदाला दाद देत मागे वळून पाहिले आणि तो क्षणच जीवघेणा ठरला. बस घाटातील रस्ता सोडून रस्त्याशेजारील मातीवर आली. चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, परंतु साइडपट्टीच्या मातीवरून घसरत जात बस थेट ८०० फूट दरीत कोसळली. दरीतल्या टेकडय़ांवर आपटत ही बस ५०० फुटांवर जाऊन अडकली. त्यात त्या बसचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले, तर कर्मचाऱयांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न होऊन दरीत विखरून पडले.
शिवसैनिक मदतीला धावले
या अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यासह महाड, पोलादपुरातील शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. पोलीस, एनडीआरएफ पथक आणि गिर्यारोहकांना शिवसैनिकांनी सहकार्य करत एक-एक मृतदेह दरीतून वर काढण्यास मदत केली. बचावकार्य करणाऱया पथकांना शिवसैनिकांनी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था केली. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी आमदार माणिक जगताप हेही घटनास्थळी पोहोचले. खोत व चव्हाण यांनी मृतदेह बाहेर काढण्याबाबत येणाऱया अडचणींसंदर्भात तातडीने सहकार्य करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
तो अर्ज शेवटचा ठरला…
या सहलीला जाण्यासाठी विद्यापीठाची बस उपलब्ध व्हावी म्हणून या कर्मचाऱयांनी व्यवस्थापनाला केलेला अर्ज हा शेवटचाच ठरला. ‘रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून आम्ही सहकारी, कर्मचारी राहुरीच्या गहू संशोधन केंद्राला भेट देऊ इच्छितो, यासाठी विद्यापीठाची बस चालकासह मिळावी’ अशी विनंती या पत्रात केली होती. या अर्जात एकूण ४० जणांची नावे, त्यांच्या स्वाक्षऱ्यांसह होती, परंतु प्रत्यक्षात सहलीसाठी दोन चालकांसह एकूण ३४ जणच निघाले.
मृतांची नावे
या अपघातात एकूण ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. या अपघातात नीलेश तांबे, सुयश बाळ, संतोष झगडे, संदीप झगडे, प्रशांत भांबीड (चालक), राजेंद्र विरकुड, रत्नाकर पागडे, प्रमोद जाधव, संदीप सुवरे, प्रमोद शिगवण, संदीप भोसले, जयंत चौघुले, राजेश बंडबे, संतोष जालगावकर, सुनील साठले, रविकिरण साळवी, सचिन झगडे, संजय झगडे, राजाराम गावडे, पंकज कदम, सचिन गिम्हवणेकर, रितेश जाधव, हेमंत सुर्वे, राजेश सावंत, सुनील कदम, रोशन तबीब, किशोर चौघुले, विकास शिंदे, सचिन गुजर यांचा मृत्यू झाला.
– अशीच घटना ऑक्टोबर १९८९ साली घडली. कोल्हापूरहून अलिबागला जाणारी बस खंडाळा घाटातील दरीत कोसळून २२ प्रवासी ठार झाले होते तर एक आदिवासी महिला लहान मुलांसह बचावली होती.
– २ जानेवारी २०१४ रोजी ठाण्याहून नगरला जाणाऱया एसटीला ट्रकने धडक दिल्याने ती माळशेज घाटातील दरीत कोसळून ३५ प्रवासी ठार झाले होते, तर काही प्रवासी सुदैवाने बचावले होते.
रात्री प्रखर प्रकाशझोतात शोधकार्य सुरू
रात्रीही मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासाठी प्रखर उजेडाचे प्रकाशझोत लावण्यासाठी ट्रान्सफॉर्मर व अन्य यंत्रणा मोठय़ा ट्रकमधून घटनास्थळी आणण्यात आली. प्रकाशझोत लावल्यानंतर शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.
प्रत्येकी चार लाखांची मदत
पोलादपूर येथील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आज महसूल आणि मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.






























































