अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरीयन तरुणास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन तरुणास कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कळंगुट पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत बागा येथून १ लाख ३० हजार रुपयांच्या गांजा आणि चरससह चीनेडू मंडे या ३० वर्षीय नायजेरीयन तरुणास अटक करण्यात आली आहे.

मंडे हा आपल्या ग्राहकाला ड्रग्स देण्यासाठी बागा येथील फॅट फिश रेस्टोरेन्ट जवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर
कळंगुट पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने सापळा रचला. मात्र मंडे नेमका कुठे येणार हे नक्की नसल्याने पोलीस मुख्य रस्त्यांबरोबर आसपासच्या परिसरात नजर ठेवून होते. मंडे ठरलेल्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याला घेरले व त्याच्या मुसक्या आवळल्या.

मंडेची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपयांचा गांजा आणि ८० हजार रुपयांचा चरस आढळून आला. दोन्हींची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत मंडेला अटक करण्यात आली आहे.

summery…nigerian man arrested for smuggling drugs