
समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील गटनेते व मुलायमसिंगांचे बंधू रामगोपाल यादव हे तसे नेक व सभ्य गृहस्थ आहेत. ते विद्वान आहेत, प्रोफेसर आहेत. राजकीय वर्तुळात त्यांना ‘प्रोफेसरसाब’ म्हणून ओळखले जाते. मुलायमसिंग यांनी राममनोहर लोहियांचा समाजवाद केवळ कुटुंबापुरताच अमलात आणल्याने यादवकुळातील बहुतांश सदस्य सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत दिसून येतात. त्यामुळे ज्यांना राजकीय संधी मिळाली नाही अशा यादवकुलीन इच्छुकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा उफाळून येत आहेत. त्यामुळे मुलायमसिंगांच्या परिवारात मध्यंतरी मोठी ‘यादवी’ माजली होती. या यादवीवेळी प्रोफेसर साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेशबाबूंची बाजू घेतली होती. त्यामुळे यादव कुटुंबीयांत मुलायम, शिवपाल विरुद्ध रामगोपाल, अखिलेश व डिंपल अशी दुफळी निर्माण झाली होती.
त्यानंतर रामगोपाल हे अखिलेशबाबूंचे ‘फिलासॉफर गाईड’ मानले जाऊ लागले, मात्र लोकसभेत अविश्वास ठरावादरम्यान रामगोपाल यांचा सल्ला अखिलेश यांनी धुडकावून लावल्याने रामगोपाल भलतेच भडकले आणि त्यांनी त्यांचा राग पत्रकारांवर काढला. अविश्वास ठरावावेळी तटस्थ राहू असा सल्ला रामगोपाल यांनी दिला होता, मात्र अखिलेश यांनी आपले पिताजी मुलायम यांचा सल्ला मानत अविश्वास ठरावाला समर्थन दिले आणि काँग्रेसची बूज राखली. त्यामुळे रामगोपाल चांगलेच खट्टू झाले. दरम्यानच्या काळात ‘नो कॉन्फिडन्स मोशन पें आपका क्या स्टँड है’ असा सवाल काही पत्रकारांनी त्यांना केला. रामगोपाल भडकले आणि ‘आप लोगों को कोई काम धंदा नही है क्या, हर दिन वहीं सवाल पुछते हो, पिछे पड जाते हो’ असे सांगत त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणीही केली. संयमी स्वभावाचे रामगोपाल ‘रागगोपाल’ का झाले याची चर्चा राजकीय वर्तुळात त्यानंतर सुरू झाली. आता अखिलेश यांनी ‘सेफ डिस्टन्स’ ठेवल्याने ‘प्रोफेसर को गुस्सा आया’ हे स्पष्ट झाले आहे. ‘प्रोफेसर साब’ यांचा राग कधी शांत होतो ते. तेच आता पाहायचे.






























































