
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पीएनबी घोटाळ्याचा फरार आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला चौकशीसाठी अँटिग्वातच रोखून ठेवा अशी विनंती पत्राद्वारे हिंदुस्थानी परराष्ट्रमंत्रालयाने अँटिग्वा आणि बार्बुडा सरकारला केली आहे.
१३ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोक्सीला जमीन ,हवाई अथवा जलमार्गाने पळण्यापासून रोखा , त्याची चौकशी होईपर्यंत त्याला देशाबाहेर जाऊ देऊ नका ,असे साकडे हिंदुस्थानने घातल्याची माहिती अँटिग्वा आणि बार्बुडा या कॅरेबिअन देशाच्या प्रशासनाने दिली. गेल्या आठवड्यात चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवल्याची माहिती मिळताच हिंदुस्थान सरकारने त्याच्याभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली.चोक्सीच्या अँटिग्वातील मुक्कामाची आणि त्याच्या हालचालींची माहिती आम्हाला कळवा अशी विनंती जॉर्जटाउनमधील हिंदुस्थानी दूतावासाने अँटिग्वा सरकारला पत्र लिहून केली आहे.




























































