
सामना प्रतिनिधी । नांदेड
दिव्यांगांसाठी राखीव असलेला तीन टक्के निधी तातडीने खर्च करावा, दिव्यांगांना त्याचा लाभ मिळावा यासाठी सोमवारी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिसरात गाजर रोवून व परिसरात चिंचोके टाकून आंदोलकांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी दिव्यांगांनी निदर्शने करत घोषणाबाजी केली.
दिव्यांगासाठी राखीव असलेल्या तीनटक्के निधी खर्चासह दिव्यांगांच्या विविध सरकारी निर्णयांची व योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी चार वर्षांपासून संघर्ष समितीतर्फे शांततेने आंदोलन करण्यात येत आहे. वारंवार निवेदने देवून आंदोलने, उपोषण करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडून फक्त आश्वासने देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेने दिव्यांगांचा राखीव निधी पूर्ण खर्च केलेला नाही. एकूण पात्र ६९७ लाभार्थ्यापैकी केवळ ४०० लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २० हजार रूपये जमा करण्यात आले. मात्र, उर्वरित दिव्यांगाच्या खात्यावर अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाही. तसेच तीन टक्के निधीसाठीचे नवीन प्रस्तावही मागविले नाहीत. अपंगांच्या बिज भांडवलचे प्रस्ताव, घरकुलासाठीचे प्रस्ताव, अपंग अव्यंग विवाह प्रोत्साहनपर योजना, स्वंयरोजगारासाठी जागा अशा विविध समस्या सोडवल्या गेलेल्या नाही. फक्त आश्वासनेच देण्यात आली.
याचा निषेध करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी यांना बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीतर्फे जिल्हा परिषद परिसरात गाजर रोवण्याचे व अधिकाऱ्याच्या हातात चिंचोके देण्याचे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी स्वतःच्या कोपराळा गूळ लावून मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनेही करण्यात आली.




























































