
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
पावसाने दिलेली ओढ, खरिपाची झालेली धुळधाण आणि डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर या परिस्थितीला कंटाळून बुलढाणा जिल्ह्यातील गजानन जायभाये या शेतकऱ्याने आपले सरण रचून त्यावर उडी घेतली. गेल्या ४८ तासांत जायभाये यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे.
शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील गोपाल तुकाराम धोटे (५०) या शेतकऱ्याने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपाल धोटे यांना १३ एकर शेती असून, त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून सव्वा लाखाचे कर्ज घेतले होते. परंतु नापिकीमुळे त्यांच्याकडून कर्जफेड झाली नाही. याच विवंचनेत त्यांनी आज मरणाला कवटाळले.
शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना अंचरवाडी येथे घडली. येथील संजय भगवान परिहार (३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरीच गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कर्जबाजारीपणा, नापिकीला वैतागून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. मोताळा तालुक्यातील पिंपळगावनाथ येथील शांताराम समाधान पाटील (३२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. शांताराम यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील गजानन जायभाये (३५) या शेतकऱ्याने स्वत: सरण रचले. त्यानंतर विष प्राशन करून अग्निप्रवेश केला. गजानन यांना ३ एकर जमीन असून, सततच्या नापिकीमुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते. महाराष्ट्र बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे उसनवार करून त्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली. याच परिस्थितीत त्यांनी फवारणीसाठी शेतात नेलेले कीटकनाशक पिले. त्यानंतर स्वत:च सरण रचून त्यात उडी घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा आहे.


























































