
>>दिलीप जोशी
धुवाधार पावसाचे दिवस आहेत. पाण्याला जीवन म्हटलं जातं. या जलकृपेनेच आता पिकं बहरतील. वन-कानन म्हणजे घनदाट जंगलातल्या वनस्पती सुखावतील. उपवन किंवा उद्यानातल्या किंवा आपल्या अंगणातल्या अथवा गॅलरीतल्या छोट्या रोपांना रोज पाणी देण्याची व्यवस्था आपण करू शकतो. ठरावीक पिकांना पाण्याचा स्रोत पुरवून त्यांच्या वाढीची काळजी घेतली जाते, परंतु डोंगरदर्यांत वाढणार्या वनस्पतींना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं. दुर्गम भागातली ही झाडंझुडपं आणि महाकाय वृक्ष केवळ पर्जन्यवृष्टीवर आपली वार्षिक तहान भागवतात. त्यांचं आणि पावसाचं एक नातं आहे. या वन्य हिरवाईने निर्माण केलेला थंडावा पावसाळी ढगांना खुणावतो आणि पाऊस बरसतो. म्हणूनच जंगलतोडीमुळे उजाड झालेल्या भागातून पावसाने कायमचा काढता पाय घेतला की, त्याचं वैराण वाळवंटात रूपांतर होतं. भूपृष्ठावर अशी अनेक उदाहरणं आढळतील. त्यासाठीच ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेप्रमाणे ‘झाडे लावा आणि जगवा’ अशी जागृतीही गरजेची असते. सध्याचा काळ वृक्षारोपणासाठी उत्तम आहे. ओलावलेल्या जमिनीत लावलेली रोपं दोन-चार वर्षांत त्याभोवती पार बांधून बसण्याइतकी सावली देऊ शकतात. डोंगरदर्यांत बिया टाकल्या तर शुष्क डोंगरमाथे पुन्हा हिरवेगार होऊ शकतात.
या वर्षी वृक्षारोपण करताना गेल्या वर्षी लावलेल्या झाडांची वाढ बघणं खूप आनंददायी असतं. म्हणूनच आपल्या संस्कृतीत झाडापानांचं वैशिष्ट्य परंपरेनं जोपासलं गेलं आहे. अंगणातल्या वृंदावनातल्या तुळशीपासून घरापासून थोड्या अंतरावर असलेला वटवृक्षापर्यंत सगळ्यांना महत्त्व आहे.
सांप्रत म्हणजे सध्या पृथ्वीवरचा एकूण वन विस्तार किती आहे. एका अंदाजानुसार एक कोटी ५० लाख चौरस मैल भरेल इतका किंवा माणूस व अन्य वन्य प्राणी राहतात त्या भूभागाच्या सुमारे ३० टक्के जागेवर वनश्री आहे. दोन-अडीचशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानात सुमारे ७० टक्के भाग जंगलाखाली होता असं म्हटलं जातं. त्यामुळेच रामायणात दंडकारण्याचा उल्लेख येतो तर महाभारतात ‘वनपर्व’ असते. या काळच्या जीवनशैलीचा तो एक अविभाज्य घटक होता. छोट्या छोट्या राज्यांच्या सीमेपलीकडे विशाल वनसंपदा पसरलेली असायची. त्यात अनेक औषधी वनस्पतीही असत. आजही आदिवासींना विविध आजारांवरच्या औषधी वनस्पतींची माहिती असते. कोणतीही वनस्पती ‘अनौषधी’ नाही असं म्हटलं जातं ते त्यामुळेच, पण प्रत्येक वनस्पतीची पारख मात्र असायला हवी.
अरण्यं, जंगलं जगात कुठे कुठे आहेत? सर्वत्र आहेत. विविध प्रकारच्या वनस्पती पृथ्वीच्या दोन्ही ध्रुव प्रदेशांपर्यंत तग धरून असतात. अर्थात संपूर्ण बर्फाळ भाग असल्यास गोष्ट वेगळी. ध्रुव प्रदेशाजवळच्या जंगलांना बोरियल फॉरेस्ट (पानगळीचं) म्हणतात. विषुववृत्ताजवळच्या दाट वनश्रीला ट्रॉपिकल किंवा उष्ण कटिबंधीय अरण्य म्हटलं जातं. पृथ्वीवरील विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला १० अंशांपर्यंत उष्ण कटिबंधातील जंगल असतं. साधारण वर्षभर थोडा थोडा पाऊस इथे पडतच असतो. त्यामुळे इथे वनस्पतींची प्रचंड आणि दाट वाढ होते. या अरण्य विस्ताराला रेन फॉरेस्ट म्हटलं जातं. आपल्याकडे दक्षिण हिंदुस्थानातलं (तामीळनाडू) ‘मुन्ननतेरई’ रेन फॉरेस्ट प्रसिद्ध आहे. अशा प्रत्येक अरण्यांची एक पर्यावरणीय रचना (इको-सिस्टम) असते. उंचच उंच वाढणार्या झाडांच्या वरच्या भागातले काही वानर कायम तिथेच राहत. काही पक्षी जंगलाच्या मध्यभागात तर कितीतरी कीटक आणि प्राणी या वृक्षराजीच्या पायथ्याशी वस्ती करून असतात. अशा रेन फॉरेस्टमध्ये विहार करणं हे जीवसृष्टीचा विस्मयकारी परिचय करून देणारं ठरतं.
पृथ्वीवरची वनं सुमारे ४० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली. आर्किओप्टेरिस या झाड आणि झुडुपं यांचं मिश्रण असलेल्या वनस्पतीपासून जंगल वाढायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. जंगल म्हटलं की, त्यात आभाळाला भिडणारे महावृक्ष, छोटी झाडं, झुडुपं, वेली, गवत सारं काही येतं. या सगळ्या वनस्पती परस्परांशी सहजीवनाने जगत असतात. त्यांची निगा राखायला कोणा माणसाची गरज नसते. माणसाच्या स्थिर वसाहती आल्यावर मात्र अनेक कारणांसाठी जंगलांवर कुर्हाड चालवली गेली. दोन-चारशे वर्षांपूर्वी हिरवाईने नटलेला भूभाग भयाण बनला. हिमालयातील वनस्पती वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगणांसारख्या तपस्वी माणसाने ‘चिपको’ आंदोलनच सुरू केलं. वनसंपत्तीचा मोह अनेकांना पडल्यामुळे वनं नष्ट झाली. त्या प्रमाणात ती निर्माण झाली नाहीत. त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम आता दिसतायत. वाळवंटी प्रदेश असलेल्या राजस्थानात याच अनुभवातून वर्षातून एका विशिष्ट दिवशी सर्व गावकर्यांनी जंगलात जाऊन रोपं लावण्याचा सण निर्माण झाला. गुरुदेव रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात तर छोट्या रोपांची पालखीच निघते. आपल्याकडे वारीमध्ये महिला डोईवर तुळस घेऊन जातात. निसर्गावर मात करून नव्हे, तर निसर्गाला साथ देऊन जगायला हवं हे जगातल्या अनेक कवी, लेखकांनी, संतांनी सांगितलं. विज्ञानवाद्यांनी वनसंवर्धनाचं महत्त्व अधोरेखित केलं, पण लक्षात कोण घेतो! आजही पृथ्वीवर पूर्वी अरण्य असलेल्या, पण सध्या निष्पर्ण बनलेल्या अनेक जागा आहेत. दरवर्षी एकेक रोप प्रत्येकानं लावलं आणि वाढवलं तर अवघ्या पृथ्वीवर किमान चार-पाच अब्ज झाडं नव्याने तग धरतील. तीच उद्याची संजीवक सावली असेल!





























































