मराठा आंदोलनाचा भडका; अश्रुधुराचा मारा, आंदोलकांवर लाठीमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
२४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला नवी मुंबई, चाकण आणि पुण्यात हिंसक वळण.

सामना प्रतिनिधी, पुणे/ सोलापूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रचंड भडका सोमवारी उडाला. चाकणमध्ये अक्षरशः आगडोंब उसळला. आठ एस. टी. बसेससह २२ वाहनांना आगी लावण्यात आल्या. यामध्ये पोलीस व्हॅन, अग्निशमन दलाचा बंब, खासगी वाहनांचा समावेश आहे. तुफानी दगडफेकीत पोलीस उपअधीक्षकांसह आठ पोलीस जखमी झाली. व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढणाऱ्या पोलीस, पत्रकार आणि नागरिकांचे २०० ते २५० मोबाईल फोडण्यात आले.

परिसरातील सीसीटीव्हीही फोडले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चाकण परिसरात तणाव असून जमावबंदी आदेश लागू केला आहे. दरम्यान, सोलापुरातही बंदला हिंसक वळण लागले. दगडफेकीत १५० एस. टी. बसेस फोडण्यात आल्या. पोलिसांनी लाठीमार केला.

चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला प्रचंड हिंसक वळण लागले. पुणे-नाशिक महामार्गावरील ७० पेक्षा जास्त वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केली. पीएमपीएल, एसटी, शिवशाही बसेससह ट्रक, टेम्पो अशी २१ वाहने पेटवून दिल्याने परिसरात आगडोंब उसळला होता. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस उपअधीक्षकांसह अधिकारी, पोलीस कर्मचारी जखमी झाले. जमावाच्या मारहाणीत पत्रकारही जखमी झाले असून त्यांच्याकडच्या साहित्याचेही नुकसान झाले. संतप्त जमावाने चाकण आणि खेड पोलीस ठाण्यावर हल्ला केला. परिसरातील दोन वाहने जाळून टाकली. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. सायंकाळी चाकणमध्ये जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाकणमधील वातावरण तणावाखाली होते.

अडकलेल्या प्रवाशांना शिवसेनेची मदत

चाकण येथे रास्ता रोको आंदोलनानंतर हिंसक वळण लागले. त्यावेळी बसमधील प्रवाशांनी बसमधून उतरून धावत बसस्थानकातील वरच्या मजल्यावर जाऊन आसरा घेतला. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले सायंकाळपर्यंत तेथेच अडकून पडली होती. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे, प्रकाश वाडेकर, रामदास घनवटे, किरण मांजरे, लक्ष्मण जाधव यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिक प्रवाशांच्या मदतीला धावले.

पेटवापेटवी करणारे बाहेरचे

शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक स्वरूप धारण केले. पोलीस ठाण्यावर दगडफेक करून वाहने पेटवून दिल्यानंतर काही जण वस्ती भागात जाऊन घरांवर हल्ले करण्याच्या प्रयत्नात होते, मात्र वेळीच सावध झालेल्या नागरिकांनी त्यांना रोखले. अनेक आंदोलनकर्ते अनोळखी दिसत असल्याने स्थानिक नागरिकही गांगरून गेले. त्यांनी विरोध सुरू केल्यानंतर हे टोळके पळून गेले. पंधरा ते पंचवीस या वयोगटातील हे तरुण आहेत. त्यांच्या हातामध्ये लोखंडी रॉड, काठय़ा, दगड असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी राम पठारे जखमी

गेली अनेक वर्षे पोलीस खात्यात सेवा करणारे उप अधीक्षक राम पठारे हे ३१ जुलै म्हणजेच मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी राम पठारे हे चाकण येथे आंदोलनाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी आपली कार तळेगाव चौकात लावली होती. अचानक आंदोलन हिंसक झाल्यानंतर यामध्ये राम पठारे जखमी झाले. त्यांची गाडी जमावाने पेटवून दिल्याची घटना घडली.