ममतांचा मोदींशी पंगा, आडवाणींशी ‘पायलागू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विळ्य़ाभोपळ्य़ाचे सख्य असलेल्या आणि एनआरसीच्या सध्याच्या तापलेल्या मुद्दय़ावरून थेट पंतप्रधानांशी पंगा घेतलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज संसदेत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणींचे पायलागू केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज संसदेत आल्यानंतर ममतादीदींनी भाजप कार्यालयाजवळच असलेल्या लालकृष्ण आडवाणींच्या कार्यालयात अचानकच प्रवेश केल्याने तृणमूलच्या खासदारांसह भाजपच्या नेत्यांची व मीडियाचीही चांगलीच पळापळ झाली. ममतादीदी अचानकच कार्यालयात आल्याचे पाहून आडवाणीही आश्चर्यचकित झाले. प्रवेश करताच ममता यांनी आडवाणींना वाकून नमस्कार करत मला आशीर्वाद द्या अशी विनंती केली. मग आडवाणी यांनीही त्यांना खुर्चीवर बसायला सांगून त्यांची ख्यालीखुशाली विचारली. यावेळी ममतांनी आडवाणींच्या तब्येतीची चौकशी केली.

ममता बॅनर्जी आणि संजय राऊत यांची सौजन्य भेट
ममता बॅनर्जी यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्य़ाचे संबंध आहेत. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची सौजन्य भेट झाली.

अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्या भेटीला
ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व यूपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांची रात्री भेट घेणार आहेत. तत्पूर्वी ममतांना भेटण्यासाठी संसदेतील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात सोनिया व राहुल यांचे निकटवर्तीय असेलल्या अहमद पटेल व गुलाम नबी आझाद या नेत्यांनी हजेरी लावली. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील गटनेते रामगोपाल यादव व खासदार जया बच्चन यांनीही ममतांची संसदेतीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात भेट घेतली.