
सामना ऑनलाईन । बीजिंग
जगभरात इंधनावर चालणाऱ्या दुचाकी जरी सर्रास वापरल्या जात असल्या तरी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मात्र या दुचाकीला चार्ज करताना त्याचा स्फोट झाल्याची घटना चीनमधील बीजिंग येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकवर चार्ज होणाऱ्या दुचाकीधारकांनी या गाड्यांचा धसकाच घेतला आहे.
चीनमधील बिजींग शहरातील एका व्यक्तीने त्याची इलेक्ट्रिक स्कूटर घरातच चार्जिंगला लावलेली होती. या व्यक्तीची लहान मुलगी व त्यांचा कुत्रा तेथेच जवळपास बसले होते. अचानक त्या स्कूटरमधून धूर येऊ लागला. त्यामुळे त्या व्यक्तीने स्कूटरचे चार्जिंग काढून टाकले. काही वेळाने स्कूटरमधून निघणारा धूर थांबेल असे त्याला वाटले मात्र क्षणार्धात स्कूटरमधून धुराचे लोट उठू लागले व मोठा स्फोट झाला. त्यानंतर स्कूटरने पेट घेतला. काही वेळातच स्कूटरला लागलेली आग घरभर पसरली. त्यानंतर जेव्हा अग्निशमन दल तेथे पोहोचले तेव्हा त्याच्या घरातील आग विझविण्यात आली मात्र तोपर्यंत घरातल्या सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते.



























































