देशाला बुटेल ट्रेनची गरज नाही, २०५० मध्ये विचार व्हावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश उपदेव । नागपूर

‘आजघडीला देशाला बुटेल ट्रेनची गरज नाही. तर २०५० मध्ये बुलेट ट्रेनचा विचार व्हावा’, असे मत नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनचे (एनएफआयआर) राष्ट्रीय महासचिव डॉ. एम. राघवैय्या यांनी गुरुवारी नागपूर येथे नोंदविले. एनएफआयआरच्या केंद्रीय कार्यकारी कमिटीच्या बैठकीनिमित्त नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

रेल्वेला अधिक गतीमान करण्यासाठी रेल्वे जाळयाचे सक्षमीकरणाची कामे होण्याची आज गरज आहे. बुलेट ट्रेन चालविण्यासाठी विदेशी कर्ज उभारावे लागणार आहे. अत्यल्प दरात यासाठी कर्ज उपलब्ध झाले तरि त्याचा रेल्वेवर भार पडेल, असेही ते म्हणाले. रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. अशा ठिकाणी अतिरिक्त रेल्वेमार्ग उभारून ही कोंडी सोडवावी. रेल्वेची गती वाढविण्यावर काम करावे. मात्र, देशात बुटेल ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे कर्मचारयांमध्ये मोठी क्षमता आहे. कारगिल युध्दाच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करून हिंदुस्थानी सेनेला मदत केली. हिंदुस्थानी रेल्वेचा ऑपरेटींग रेशो ९४. टक्के आहे. शंभर रूपयामागे रेल्वे ६ रूपयांची बचत करित आहे. याशिवाय उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोतही रेल्वेकडे उपलब्ध आहे. नवीन गाड्या सुरू करित असताना संबधीत विभागनिहाय पदांची निर्मिती केली जात नाही. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा भार येत असून यामुळे दुर्घटनेचा धोका वाढतो, असेही राघवैय्या यांनी स्पष्ट केले.