
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो याचा प्रत्यय आता पाकिस्तानातील राजकीय घडामोडींनी येत आहे. “तेहरीक ए इन्साफ” पक्षाचा प्रमुख इम्रान खान पाकिस्तानचा नवा पंतप्रधान होणार असे चित्र स्पष्ट होत असतानाच पाकिस्तानच्या अन्य सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून इम्रानविरोधात एकजूट केली आहे. २७० पैकी ११६ जागा जिंकून संसदीय निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान इम्रानच्या पक्षाने मिळवला आहे. पण आता इम्रानला बहुमतापासून रोखण्यासाठी पीएमएल ( नवाझ ), बिलावल भुत्तोंचा पीपीपी या पक्षांनी अन्य राष्ट्रवादी आणि धार्मिक पक्षांशी युती करीत ऑल पार्टी कॉन्फरन्स नावाची आघाडी उभी केली आहे. या आघाडीचा उमेदवार पंतप्रधानपदाच्या निवडीत इम्रान खानला आव्हान देणार आहे.
इम्रान खानच्या तेहरीक ए इंसाफ पक्षाने पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत ११६ जिंकल्या आहेत. बहुमतांसाठी काही छोटे पक्ष आणि अपक्ष खासदारांच्या मदतीने इम्रान बहुमत सिद्ध करून पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो. पण विरोधकांच्या एकजुटीमुळे इम्रानकडे काठावरील बहुमत उरेल .त्यामुळे निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करताना इम्रानची तारांबळ उडणार आहे.
नवाझ शरीफ -बिलावल भुट्टो गटाची हातमिळवणी
पाकिस्तानी राजकारणात एकमेकांशी कट्टर शत्रुत्व असणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांच्यात हातमिळवणी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने अन्य छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने ऑल पार्टी कॉन्फरन्स नावाची आघाडी बनवली आहे. पाकिस्तानी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप पीएमएल (नवाझ) पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी केला आहे. त्यामुळेच इम्रानला एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय आपल्या पक्षाने घेतल्याचे मरियम यांनी स्पष्ट केले.अर्थात विरोधकांच्या या एकजुटीनंतरही इम्रान संसदेत बहुमत मिळवून पंतप्रधानपदी बसणार असे स्पष्ट संकेत आहेत.





























































