देशात एकत्रित निवडणुका संघराज्यविरोधी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या मोदी सरकारच्या ‘वन इलेक्शन, वन नेशन’ या संकल्पनेला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. एकत्रित निवडणुका घेण्याचा प्रकार हा संघराज्यविरोधी आहे, अशी भूमिका काँग्रेसने विधी आयोगासमोर मांडली आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी शुक्रवारी विधी आयोगाची भेट घेतली. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यास काँग्रेसचा कडाडून विरोध राहील, असे त्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी विधी आयोगाला निक्षून सांगितले.

‘वन इलेक्शन, वन नेशन’मुळे निवडणूक खर्चात कपात होऊन पैशांची बचत होईल, असा मोदी सरकारचा होरा आहे. निवडणूक खर्चात कपात होण्याच्या मुद्दय़ावरून समाजवादी पार्टीसह अनेक पक्षांनी एकत्रित निवडणुका घेण्यास पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण विधी आयोगासमोर काँग्रेसने एकत्रित निवडणुकांना प्रखरपणे विरोध केला जाणार असल्याचे आता सांगून टाकले आहे.

‘वन इलेक्शन, वन नेशन’ हासुद्धा केवळ एक जुमला म्हणजे लाकांना मूर्ख बनवणारा प्रकार आहे. एकत्रित निवडणुकांची संकल्पना लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आणि जनविरोधी आहे. मोदी सरकारच्या या प्रस्तावाला हुकूमशाही प्रवृत्तीचा दर्प आहे.
-अभिषेक मनू संघवी, ज्येष्ठ काँग्रेस नेते