दहशतवादविरोधी लढ्यासाठी एटीएस घेणार पुस्तकांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दहशतवाद हा केवळ महाराष्ट्र, हिंदुस्थानसाठीच नाही तर जगासाठी एक आव्हान बनला आहे. आजच्या घडीला मुंबई, महाराष्ट्रातून अनेक मुस्लिम तरुण इसीसचा रस्ता धरत आहे. त्यामुळे एकूण महाराष्ट्राच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण झाला असून एटीएस म्हणजेच  दहशतवादविरोधी पथकासाठी हे मोठे आव्हान झाले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी आता तज्ज्ञांनी दहशतवादावर लिहिलेल्या पुस्तकांची मदत घेण्याचे एटीएसने ठरवले आहे. मराठीतून लिहिलेली पुस्तकेच वापरण्यात येणार आहेत. अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी दिली.

जगाच्या कानाकोपर्‍यातील दहशतवादाशी निगडीत विविध विषय पुस्तकांमध्ये असतील. या माहितीच्या माध्यमातून एटीएसच्या अधिकार्‍यांना दहशतवादाचे धागोदोरे शोधण्यास मदत होणार आहे. ही पुस्तके एटीएस अधिकारी, कर्मचार्‍यांना अभ्यासासाठी दिली जाणार आहेत. सुरुवातीला ३५० पानांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. नामवंत आणि तज्ज्ञ लेखकांनी लिहीलेल्या पुस्तकांमधील माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

  • दहशतवादाशी निगडित गोष्टी समजण्यासाठी आठ लघुचित्रपटही प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
  • आणखी दोन पुस्तके प्रकाशित करण्यात येणार असून या पुस्तकांसाठी मराठीच नाही तर इंग्रजी, उर्दू आणि हिंदी पुस्तकांतील माहितीचाही वापर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

काय आहे या पुस्तकात

सध्याच्या काळातील दहशतवादाशी निगडित सर्व गोष्टी या पुस्तकात आहेत. दहशतवाद्यांची मानसिकता, दहशतवाद पसरवण्यासाठी त्यांच्याकडून तरुणांना देण्यात येणारे प्रशिक्षण, दहशतवाद्यांनी जगभरात केलेले विविध मोठे हल्ले, जगभरातले तरूण दहशतवादाकडे कशाप्रकारे आणि का आकर्षित होतात. द इस्लामिस्ट-मी ब्रिटनमध्ये पुरोगामी इस्लामशी का जोडला गेलो, या धर्मात मी काय पाहीले आणि कशाकडे दुर्लक्ष केले या युकेतील ईद हुसैन या लेखकाने लिहिलेले महत्तवपूर्ण मुद्देही पुस्तकात आहेत. तसेच द मेमोईर हे हुसैनचेच २००७ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील मुद्देही या पुस्तकात आहेत.