
>> पंढरीनाथ तामोरे
मच्छीमारांचा आधारवड अशीच रामभाऊ कान्हा पाटील यांची ओळख होती. पालघरजवळील वडराई येथे १३ ऑक्टोबर १९३९ रोजी रामचंद्र कान्हा पाटील ऊर्फ रामभाऊ पाटील यांचा मांगेला मच्छीमार समाजात एका शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या घरात जन्म झाला. रामभाऊंना सामाजिक कार्याचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. वडराई गावचेच स्वातंत्र्यसैनिक मारुतीराव मेहेर यांच्या प्रेरणेने ते राष्ट्र सेवादलाच्या कार्याशी जोडले गेले. राष्ट्र सेवादलाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, विविध विषयांवरील प्रबोधनपर शिबिरे या कार्यात त्यांनी झोकून दिले.
१९६७ मध्ये महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांसाठी विशेष सवलती सुरू केल्या. तेव्हा रामभाऊंनी नोकरी सोडली आणि एक मच्छीमारी बोट विकत घेतली आणि ते प्रत्यक्ष मासेमारी करू लागले. त्यामुळेच त्यांना मच्छीमार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांची अगदी जवळून जाणीव झाली. १९७१ च्या दरम्यान पालघरचे तत्कालीन आमदार नवनीतभाई शाह यांनी मच्छीमारांची कर्जमाफी, त्यांचे पुनर्वसन यासाठी विधान मंडळाकडे विनंती केल्याच्या समर्थनार्थ भाई बंदरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, निदर्शने, धरणे यासारख्या आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. तेव्हा शासनाने डिझेल वगळता मच्छीमारांच्या सर्व साधनांवर सेल्स टॅक्स माफ केला. मात्र डिझेल टॅक्स फ्री होण्यासाठी आंदोलन पुढे सुरू राहिले. या लढ्यामुळेच १९७८ मध्ये पुलोद सरकार असताना मच्छीमारांना डिझेलसाठी सबसीडी मंजूर करण्यात आली.
मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी कार्य करीत असताना १९८० साली त्यांच्याच गावच्या वडराई मच्छीमार सहकारी सोसायटीचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आणि चेअरमन या नात्याने सोसायटीला ऊर्जितावस्थेत आणले. १९७७ मध्ये ते माहीम ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. १९८३ मध्ये ते सरपंच झाले. सरपंचपदाच्या कारकीर्दीत त्यांनी केळवा, माहीम ते दातिवरे या परिसरासाठी त्यावेळी दोन कोटी रुपयांची पाण्याची योजना अनेक अडचणीवर मात करून मंजूर करून कार्यान्वित केली. सरचिटणीस म्हणून १९८७ मध्ये त्यांनी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या माध्यमातून कार्यास सुरुवात केली. या काळात केंद्र शासनाने डिझेलवरील एक्साईज ड्युटी माफ करावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांस यश येऊन डिझेलवरील एक्साईज ड्युटी माफ करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर मच्छीमार संघटनेचे कार्य करीत असताना फादर थॉमस कोचेरी यांच्याशी त्यांचा संबंध आला. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक लढे दिले. १९९५ मध्ये त्यांची राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली. मोठ्या ट्रॉलरच्या मासेमारीने सागरी पर्यावरणाचा विनाश होतो हे लक्षात आल्याने त्या विरोधात त्यांनी ‘कच्छ ते कन्याकुमारी ते डायमंड हार्बर कोलकाता’ असा दहा राज्यांच्या सागरी किनार्यावर लढा उभारला. फॅक्टरी फिशिंगचा धोका ओळखून त्याविरोधात त्यांनी आंदोलन उभारले. ४ फेब्रुवारी १९९४ रोजी संपूर्ण देशातील मच्छीमारी व मासेविक्री बंद ठेवून संप पुकारला होता.
मच्छीमारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या मुरारी कमिटीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याच्या कमिटीत त्यांची निवड झाली होती. जागतिकीकरणाच्या जी-८ विरोधात त्यांनी २००३ मध्ये पालघर, डहाणू, वसई व मुंबई येथील ओएनजीसीवर भव्य मोर्चे काढले होते आणि आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी सलग दहा दिवस उपोषण केले होते. जागतिकीकरणाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला असताना त्यांना युरोपमधील आंदोलनात जर्मनी येथे अटक करण्यात आली होती. शासनाला या आंदोलनाची दखल घेऊन मच्छीमारांच्या हिताच्या विरोधात असलेले धोरण मागे घ्यावे लागते. पश्चिम किनारपट्टी ही मच्छीमारांसाठी गोल्डन कॉरिडॉर म्हणून ओळखली जाते. याच किनार्यालगतच्या निमखार्या पाण्यात मासे अंडी घालतात. त्यामुळे या किनारपट्टीवर माशांची मैदास चांगली होते. शासनाने डहाणूजवळील वाढवण बंदर प्रस्थापित केल्यानंतर या बंदराच्या मेगापोर्टमुळे माशांच्या पैदाशीवर होणारा परिणाम आणि स्थानिक मच्छीमारांचा फिशिंग एरिया नष्ट होण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी आंदोलन उभारले. या बंदरविरोधी आंदोलनात अनेक एनजीओ संघटना आणि अखिल हिंदुस्थानी मांगेला समाज परिषदेने मदत केली. या आंदोलनाचे प्रखर स्वरूप लक्षात घेऊन शासनाने वाढवण बंदराला स्थगिती दिली.
पालघर परिसरातील सर्वात मोठ्या असलेल्या माहीम ग्रामपंचायतीचे सरपंच, अ. भा. मांगेला समाजाचे उपाध्यक्ष, वडराई मच्छीमार सोसायटीचे चेअमरन, ठाणे जिल्हा मच्छीमार संघर्ष निवारण समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे चेअरमन, केंद्रीय कृषी मंत्रालयाने सुचविलेल्या मासेमारीसंदर्भातील शिफारसींच्या आढावा समितीचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य फिशरीज एक्सपर्ट कमिटीचे सदस्य, युनोच्या इको सोसिमो कमिटी सदस्य, जागतिक मच्छीमार संघटनेचे कार्यकारी सदस्य अशा अनेक विविध समत्यांवर ते कार्यरत होते. त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे यामुळे ते मच्छीमार वर्गातच नव्हे, तर सर्वच समाजघटकात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने मच्छीमारांचा एक आधार निखळून पडला आहे.






























































