उल्हासनगर @ ६९

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

हिंदुस्थानच्या फाळणीनंतर वसलेल्या उल्हासनगरचा ६९ वा वाढदिवस मोठय़ा दिमाखात बुधवारी ८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. एकीकडे वाढदिवसाचा आनंद असतानाच दुसरीकडे ८ ऑगस्ट १९४९ च्या उद्घाटनप्रसंगाची कोनशिला अजूनही कोंडवाडय़ातच खितपत पडली आहे. ही कोनशिला मोकळा श्वास घेणार तरी कधी, असा एकच सवाल शहरवासीयांनी केला आहे.

फाळणीनंतर पाकिस्तानातील असंख्य सिंधीबांधवांनी हिंदुस्थानातील उल्हासनगरात येऊन आश्रय घेतला. त्यांची सोय स्वतंत्र मिलिटरी कॅम्पमध्ये करण्यात आली. त्यानंतर सिंधीबांधवांनी अनेक छोटे-मोठे उद्योग केले. लोकल ट्रेनमध्ये गोळय़ा बिस्किटेही विकली. कालांतराने ही मंडळी उल्हासनगरच्या संस्कृतीशी एकरूप झाली. मिलिटरी कॅम्पला उल्हासनगर असे नाव देण्याचा सोहळा तत्कालीन गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या उपस्थितीत झाला. तसेच त्यांच्या हस्ते एका मोकळय़ा भूखंडावर कोनशिला बसवण्यात आली. या कोनशिलेसमोरच उल्हासनगर परिषदेची वास्तू बांधली असून ही कोनशिला आता अडगळीत पडली आहे. या कोनशिलेचा प्रथमदर्शनी भाग हा विरुद्ध दिशेकडे असून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोनशिलेच्या बाजूलाच पालिकेने तरणतलाव बांधला, भिंती उभारल्या. त्यामुळे या कोनशिलेची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.