पद्म पुरस्कारांसाठी आतापर्यंत ११ हजारहून अधिक अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

२०१९ च्या पद्म पुरस्कारांसाठी मोठीच झुंबड उडाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी केंद्र सरकारकडे ११ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. गृह मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. या पत्रकानुसार गृह विभागाकडे पद्म पुरस्कारांसाठी ११,४७५ अर्ज आले आहेत, त्यापैकी १०,४५३ अर्जांचे नामांकन केले गेले आहे.

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार दिले जातात. १५ सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे, पण शेवटच्या तारखेच्या दीड महिन्यापूर्वीच ११ हजारहून अधिक अर्ज गृह विभागाला प्राप्त झाले आहेत. विभागाने १ मे पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली होती. या पुरस्कारांचे वितरण पुढल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी होईल. गतवर्षी पद्म पुरस्कारांसाठी ३५ हजार अर्ज आले होते, त्यापैकी ८५ लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मंत्रालय, शासकीय विभाग, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे शासन, भारतरत्न आणि पद्म पुरस्कार विजेते यांच्याकडून पद्म पुरस्कारासाठी शिफारसी स्विकारल्या जातात. पुरस्कार वितरणासाठी गठीत केलेली समिती या नावांवर विचार करते. शिफारस मिळाल्यानंतर पंतप्रधान, गृह मंत्री आणि राष्ट्रपती या शिफारसींना अनुमोदन देतात. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली जातात.

पद्म पुरस्कारांसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दिली गेली आहे. www.padmaawards.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज कर्त्यांना अर्ज करावा लागणार आहे. पद्म पुरस्कारात पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. १९५४ साली सुरूवात झालेल्या या पुरस्कारांत शिक्षण, साहित्य, कला, संशोधन, क्रीडा, अर्थशास्त्र, विज्ञान, सामाजिक कार्य, उद्योग सारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.