
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेडचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली यापूर्वी संभाजीनगर येथे झाली होती. मात्र ती बदली आता रद्द करुन त्यांना पोलीस अधीक्षक लोहमार्ग संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आणखी नऊ जणांच्या नियुक्त्या विविध ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक चंदकिशोर मीणा यांनी आपल्या पदाचा पदभार संजय जाधव यांना दिल्यानंतर ते आपल्या पूर्वीच्या नियुक्तीच्या जागी पोलीस उपायुक्त संभाजीनगर येथे रुजू होतील अशी अपेक्षा होती. मात्र पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे यापूर्वी नांदेडला विशेष पोलीस महानिरीक्षक असताना त्यांच्यात आणि मीणात बरेचसे वाद निर्माण झाले होते. यामुळे हा वाद टाळण्यासाठी त्यांनी शासनाकडे आपली बदली अन्यत्र व्हावी यासाठी विनंती केल्याचे समजते. त्यानुसार सोमवारी पदभार सोडल्यानंतर दुपारी आलेल्या आदेशानुसार चंद्रकिशोर मीणा पोलीस अधीक्षक लोहमार्ग संभाजीनगर येथे रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदली प्रकरणावर आता पडदा पडला आहे. यासोबतच राज्यातील अन्य आठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही गृह विभागाने जारी केले आहेत. त्यात पोलीस अधीक्षक निर्मलादेवी या अगोदर विदर्भात होत्या. त्यांची बदली मुंबई शहर येथे झाली होती. त्यांना आता नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. निसार तांबोळी यांची वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. त्यांना उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. बसवराज तेली यांची बदली पोलीस अधीक्षक लोहमार्ग येथे करण्यात आली होती त्यांना पोलीस अधीक्षक वर्धा येथे नियुक्त करण्यात आले आहे. निकेश खाटमोडे यांची बदली पोलीस उपायुक्त मुंबई येथे करण्यात आली होती. ते आता मीणा यांच्या जागी पोलीस उपायुक्त संभाजीनगर येथे रुजू होणार आहेत.
तसेच सुनील भारद्वाज यांची अकोला येथे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे बदली करण्यात आली होती. त्यांची बदली सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई येथे करण्यात आली आहे. प्रशांत कदम हे ठाणे ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक होते. त्यांची मुंबई शहरात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. संजय सुरदौडा हे हिंगोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले होते. त्यांची अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. श्रीमती लता फड या महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे बदली होवून गेल्या होत्या. त्यांना पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग संभाजीनगर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाने आठ दिवसापूर्वीच अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना आता नव्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.






























































