पांड्याची कपिल देव यांच्याशी तुलना करणे ‘बकवास’ !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या खेळाची तुलना महान अष्टपैलू आणि देशाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्याशी केली जाते. याबाबत माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी याला बकवास असे म्हटले आहे. कपिल देवसारखा खेळाडू १०० वर्षात एकदाच जन्म घेतो त्यामुळे कोणत्याही खेळाडूची त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

एका चॅनलवर बोलताना गावस्कर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, ‘कपिल देव यांच्याशी कोणाचीही तुलना केली जावू शकत नाही. एका पिढीत जन्म घेणारा तो खेळाडू नसून १०० वर्षात एकदाच जन्म घेणारा तो खेळाडू आहे. जसे की डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर. आपण कोणत्याची खेळाडूची त्यांच्यासोबत तुलना न केलेलीच योग्य.’

धवनच्या खेळाबाबत व्यक्त केली नाराजी
यावेळी गावस्करा यांना सलामीवीर शिखर धवन याच्या खेळाबाबतही नाराजी व्यक्त केली. धवनने पहिल्या डावात २६ आणि १३ धावा केल्या होत्या. ‘शिखर धवन आपल्या खेळात कोणताही बदल करताना दिसत नाही. ज्या खेळाच्या बळावर त्याला यश मिळाले तो त्याच पद्धतीने येथे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. वन डे क्रिकेटमध्ये तुम्ही मोठे शॉट खेळताना वाचू शकता कारण काही षटकानंतर स्पिपमध्ये खेळाडू नसतात परंतु कसोटीत अशा पद्धतीने शॉट खेळणे म्हणजे विरोधी संघाला तुमची विकेट बक्षिसात देण्यासारखे आहे. जोपर्यंत खेळाडूच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत विदेशात उसळत्या चेंडूसमोर तो खेळू शकत नाही,’ असे गावस्कर म्हणाले.