
सामना ऑनलाईन । सुकमा
छत्तीसगढमधील आदिवासीबहुल बस्तर भागात प्राबल्य असलेल्या नक्षलवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी आज जबरदस्त हादरा दिला. सुकमा जिल्हय़ातील जंगलात झालेल्या चकमकीत जवानांनी १५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यात दोन नक्षलवादी जखमी झाले आहेत. त्यात एक महिला नक्षलवादी आहे.
ही चकमक सुकमा जिल्ह्यात गोल्लाप्पाल्ली आणि कोंटा या दरम्यान असलेल्या नालकटोंग गावाजवळच्या जंगलात झाली. या चकमकीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये ३१५ बोअर आणि १२ बोअरच्या १६ बंदुकांचा समावेश आहे. याचबरोबर नक्षलवाद्यांचा एक एरिया कमिटी मेंबर आणि एका महिला नक्षलवादी जेरबंद केली आहे. या एरिया कमिटी मेंबरवर सुरक्षा दलांनी पाच लाखांचे इनाम ठेवलेले होते.
दक्षिण सुकमाच्या कोंटा, गोलापल्ली आणि भज्जी येथील तिहेरी जंगलाच्या जंक्शनमध्ये माओवाद्यांचे तीन गट कार्यरत आहेत. यामधील ठार झालेले नक्षलवादी आहेत, अशी माहिती नक्षलवादीविरोधी कारवाईचे राज्याचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली. मृतात प्लॅटून कमांडर वन्जाम हुन्गा यांचा समावेश आहे. इतर १४ मृत नक्षलवाद्यांची ओळख पटू शकली नाही.
नक्षलवाद्यांचे कंबरडेच मोडले
गोलापल्ली- कोंटा दरम्यानच्या गावातील जंगलात माओवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचरांकडून मिळाली. यानंतर सीआरपीएफ, डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डस आणि स्पेशल टास्क फोर्सच्या जवानांनी संयुक्तपणे या जंगलात वेढा देऊन नक्षलवाद्यांची कोंडी केली. जवान नक्षलवाद्यांच्या अड्ड्याजवळ पोहोचले तेव्हा नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात मोठ्या फौजफाट्यासह आलेल्या सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये १५ नक्षलवादी मारले गेले. ही मोहीम सुरक्षा दलाच्या उत्तम नियोजनामुळे फत्ते झाली आहे. या कारवाईने नक्षलवाद्यांचे सुकमा जिल्ह्यात कंबरडेच मोडले आहे.

























































