उद्याने रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील उद्याने सायंकाळी ७ ते ८ वाजता बंद होत असल्यामुळे कामावरून उशिरा घरी जाणाऱया नोकरदारांना उद्यानात फेरफटका मारता येत नाही. त्यामुळे पालिकेची उद्याने रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवावीत अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. याबाबत त्यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली.

मुंबई पालिकेच्या उद्यानांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र याचा लाभ रात्री उशिरापर्यंत कामावर असलेल्या नोकरदारांना घेता येत नाही. त्यामुळे उद्याने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यास त्यांना उद्यानांमध्ये फेरफटका मारणे शक्य होणार आहे. मात्र ७ ते ८ वाजता उद्यान बंद झाल्याचे सांगत सुरक्षारक्षकांकडून प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे उद्यानांची वेळ वाढवण्याची मागणी पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या आरोग्यासाठी उद्यानांची वेळ रात्री साडेदहा ते ११ वाजेपर्यंत वाढवावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांशी झालेल्या भेटीत केली. दरम्यान, मुंबईकरांच्या सोयीसुविधांसाठी आणि सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे व्हावेत यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या विविध प्रश्नांवर चर्चा

मुंबईतील विविध प्रश्नांबाबत आपण प्रत्येक महिन्यात आयुक्त आणि महापौरांची भेट घेत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर कचराकुंडय़ा, कचरा व्यवस्थापन, रुग्णालयातील इन्क्युबेटर अशा विविध प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा झाल्याचे ते म्हणाले. मुंबईत पेट क्लिनिकची संख्या वाढली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले.