चमत्काराचे आमीष दाखवून फसवले, डॉक्टरचा परवाना ५ वर्षांसाठी रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

स्टेम सेल थेरपी तज्ञ असल्याचं भासवत गतिमंद मुलावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरचा परवाना ५ वर्षांसाठी रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने या डॉक्टरला लेखी स्वरूपात परवाना रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. स्टेम सेल थेरपीसाठी हिंदुस्थानी वैद्यकीय परिषदेने अत्यंत कठोर नियमावली तयार केलेली आहे. यासाठी या विषयाचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. हे माहिती असतानाही रेडियोलॉजी विषयाचा डिप्लोमा असलेल्या डॉक्टर सुनील वाघमारे याने गतिमंद मुलावर स्टेम सेल पद्धतीने उपचार करण्याचं आश्वासन मुलाच्या पालकांना दिलं होतं.

हा सगळा प्रकार २०१० सालचा आहे. संभाजीनगरचे रहिवासी असलेले गोपाळ डोनखडे हे त्यांच्या मुलावर उपचार होऊन तो बोलायला लागावा यासाठी प्रचंड धडपड करीत होते. वाघमारे याने डोनखडेंना आश्वासन दिलं होतं की तो त्यांच्या मुलावर स्टेम सेल पद्धतीने उपचार करेल ज्यामुळे काही दिवसातच खणखणीतपणे बोलायला लागेल. डोनखडे यांना वाघमारे हा चमत्कार करू शकतात यावर विश्वास बसला ज्यामुळे त्यांनी उपचारावर ३ लाख रुपये खर्च केले.

डोनखडे यांच्या मुलाला डिस्चार्च मिळण्याची वेळ आली मात्र तरीही तो एक शब्दही बोलत नव्हता.  वाघमारे याने आपल्याला धीर धरा असं म्हणत मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या द्या असा सल्ला दिल्याचं डोनखडेंनी सांगितलं. मुलाला डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तो बोलत नाही हे पाहून डोनखडे यांनी वाघमारे याची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर केलेल्या चौकशीमध्ये वाघमारे दोषी आढळला आहे. वाघमारे याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती, यावेळी स्टेम सेल पद्धतीने उपचार करण्यासाठी संशोधन केल्याचा कोणताही पुरावा तो सादर करू शकला नाही. आपण या मुलावर एका तज्ञ डॉक्टरच्या उपस्थितीत स्टेम सेल पद्धतीने उपचार केल्याचा दावाही वाघमारेने केला होता. चौकशीदरम्यान तो तज्ञ डॉक्टर कोण होता याबाबत वाघमारे कोणतंही उत्तर देऊ शकला नाही.

वाघमारे याने परिषदेच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आपण याबाबत सुनावणी करणार नाही असं सांगत वैद्यकीय परिषदेला पुन्हा एकदा सुनावणी घ्या असे निर्देश दिले होते. पुन्हा झालेल्या चौकशीतही वाघमारे दोषी आढळल्याने त्याचा परवाना ५ वर्षांसाठी रद्द करण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. वाघमारे याला याबाबत विचारलं असता त्याने सांगितलं की मी स्टेम सेल पद्धतीने उपचारावर आयोजित केलेल्या अनेक सेमिनारला उपस्थित राहीलो आहे.. मुंबईत असे अनेक डॉक्टर स्टेम सेल पद्धतीने उपचार करीत आहे, ते सगळे  हिंदुस्थानी वैद्यकीय परिषदेच्या नियमावलीचं तंतोतंत पालन करतात का ?