
सामना प्रतिनिधी। पंढरपूर
सकल मराठा समाजातील तरुणांनी ९ ऑगस्टचे आंदोलन शांतताप्रिय मार्गाने करावे. आंदोलनाला कसलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या आंदोलनात घुसून कोणी हिंसा केली तर जाट, गुज्जर आणि पटेल यांच्या आंदोलनाप्रमाणे आपले आंदोलन चिरडले जाऊ शकते तेंव्हा समाज बांधवांनी संविधानिक पद्धतीने आंदोलन करावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी केले.
पंढरपूर मधील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे काढले पण शासनाची त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. शासन आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणा करीत आहे.
शासनाच्या मनात असेल तर ते लगेच देऊ शकतात. शासनाने तातडीचे अधिवेशन बोलवावे जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यावर निर्णय घ्यावा.गेल्या आठ दिवसातील आंदोलनात दहा हजार लोकांवर पोलीस कारवाई करण्यात आली आहे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे टाकण्यात आले आहेत. चाकण आणि नवी मुंबईतील आंदोलनात परप्रांतीयांनी तोडफोड केल्याचे समोर येत आहे. यामुळे आपल्या समाज बांधवानी आंदोलनात सजग रहावे असे आवाहन गायकवाड यांनी केले.
तसेच आमच्या मागण्यांवर निर्णय लागे पर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले याप्रसंगी अमरजित पाटील, दीपक वाडदेकर उपस्थित होते.
summary…maratha andolen should not be crushed































































