
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह देशातील अनेक राज्यांत महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर जागोजागी बलात्कार आणि अत्याचार होत आहेत. मुझफ्फरपूर आणि देवरियातील बालिकागृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांना त्यावर किमान भाष्य करणेही महत्त्वाचे वाटत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील महिला अधिकार संमेलनात बोलताना केला. ‘बेटी बचाओ’ असा नारा भाजपने दिलाय खरा, पण आता भाजप आमदार आणि नेत्यांपासूनच ‘बेटी बचाओ’ असा नारा देण्याची गरज भासू लागली आहे, असा टोलाही राहुल यांनी लगावला.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने केंद्रातील मोदी सरकारने चार वर्षांत कोणती पावले उचलली, असा सवाल करीत राहुल गांधी म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस ) आणि भाजपमधील लोकांचा पुरुषप्रधान संस्कृतीवर दृढविश्वास आहे. त्यांना महिलांनी पुढे यावे आणि नेतृत्व करावे असे मुळीच वाटत नाही. महिला कायम मागे राहाव्यात असे संघाला वाटते. म्हणूनच संघात महिलांना स्थान दिले जात नाही अशी टीकाही राहुल यांनी केली. मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले होते त्याकडे दिशानिर्देश करीत काँग्रेस अध्यक्षांनी ‘बेटी बचाओ ,बेटी पढाओ’ या घोषणेवर भाष्य केले. ते म्हणाले, सत्ताधारी नेत्यांकडूनच मुलींवर अत्याचार होत असतील तर आपल्यावर भाजप आमदार आणि नेत्यांपासून बेटी बचाओ असे म्हणण्याची वेळ येईल.
पक्षात आणि सत्तेत महिलांना ५० टक्के वाटा
काँग्रेसने नेहमीच महिलांना समानतेची वागणूक दिली आहे. म्हणूनच काँग्रेस राजवटीत देशाचे आणि पक्षाचे नेतृत्व महिलांनी समर्थपणे केले आहे, असा दावा करीत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत महिलांना काँग्रेस पक्षात आणि सत्तेत ५० टक्के वाटा देणे हा प्रमुख अजेंडा असेल असे जाहीर केले.

























































