
सामना प्रतिनिधी । बीड
शेतकऱ्याना नागवण्याचे काम कसे शिस्तबद्ध केले जाते. याचा प्रत्यय वडवणीमध्ये आला. ज्यावेळी तूर खरेदी सुरू होती. त्यावेळी खरेदी केंद्र बंद ठेवून शेतकऱ्याना वेठीस धरण्याचे काम करण्यात आले आणि आता तूर खरेदी बंद असताना शासकीय गोडाऊनमध्ये तब्बल २०० क्विंटल तूर शेतकऱ्याकडून खरेदी करण्यात आली. ३५०० रूपये भावाप्रमाणे खरेदी केलेल्या तुरीच्या पावत्या शेतकऱ्याना दिल्या गेल्या नाहीत. या खरेदीचा बाजार समितीला थांगपत्ताही नव्हता. खरेदी केंद्रप्रमुख गणेश चोरमले आणि त्यांचे बंधू नंदकुमार चोरमले यांच्या कारनाम्याचा बाजार समितीने पंचनामा केला आहे. या तूर खरेदी घोटाळ्यात वडवणीच्या खरेदी केद्रासह फेडरेशनचे कर्मचारी सहभागी असल्याचे बोलले जात आहे.
वडवणीमध्ये हमीभावामध्ये तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र जेव्हा तूर खरेदी केद्र सुरू होते तेव्हा शेतकऱ्याच्या तुरी खरेदी करण्यास वडवणीच्या केद्रावर टाळाटाळ केली जायची. शेतकरी तूर घेवून खरेदी केद्रावर आले की, खरेदी केंद्र बंद असायचं, शेतकाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम खरेदी केद्रावर केले जायचे. नाविलाजाने या सर्व त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानी आपली तूर व्यापाऱ्याना देणे पसंत केले होते. आणि आता खरेदी केंद्र बंद असताना वडवणीत दोन दिवसापूर्वी शेतकऱ्याकडून शासकीय गोडाऊनमध्ये तब्बल २०० क्विंटल तूर प्रतिक्विंटल ३५०० रूपये दराने खरेदी करण्यात आली. ज्या नंदकुमार चोरमले यांना तूर खरेदी केद्रावर आणि परिसरात बंदी घालण्यात आली होती. त्या नंदकुमार चोरमले आणि त्यांचे बंधू गणेश चोरमले यांनी शासकीय गोडाऊनमध्ये कमी किमतीत शेतकऱ्याची तूर खरेदी केली. खरेदी केलेल्या तुरीच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. विशेष म्हणजे या खरेदीचा वडवणीच्या बाजार समितीला थांगपत्ता लागू दिला नव्हता. अधिक चौकशीनंतर तूर खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर वडवणीचे बाजार समितीचे सचिव विश्वनाथ गार्डी यांनी अवैध तूर खरेदीचा पंचनामा केला. या तूर खरेदीच्या घोटाळ्यात केंद्रप्रमुखांसह मार्केटींग फेडरेशनचे काही वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याचे बोलले जाते. म्हणूनच मार्केटींग फेडरेशन केद्रप्रमुखाला पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. या सर्व घोटाळ्याची आणि तूर खरेदीच्या गौडबंगालची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




























































