माढात चक्काजाम, कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माढा

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या आरक्षण व अन्य मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी गुरूवारी चक्का जाम करून आंदोलनाची तीव्रता कायम ठेवली.

मराठा समाजाकडून क्रांती दिनाचे औचित्य साधून चक्काजामचे आवाहन करण्यात आले होते. त्याला माढा व परिसरातील असंख्य मराठ्यांनी प्रतिसाद देत सकाळी १० वाजल्यापासून प्रमुख  शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात केली होती. माढ्यातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी, हॉटेल व्यवसायिकांनी सकाळ पासून उस्फूर्तपणे बंदला पाठिंबा देत आपली दुकाने बंद केली आहेत.

पेट्रोल पंप, शाळा महाविद्यालय,  खाजगी वाहने, एस टी सेवा बंद करण्यात आली. माढा येथून  सोलापूर वैराग बार्शी तसेंच जवळपासच्या खेडेगावात होणाऱ्या ११० एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याचे माढा वाहतूक नियंत्रक किशोर सोनवणे यांनी सांगितले तर खाजगी वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. फक्त अॅम्ब्युलन्स सेवा व अत्यावश्यक सेवा सुरू असल्याची माहिती तहसीलदार सदाशिव पडदूणे यांनी दिली.

माढा येथे प्रमुख शिवाजी चौकात चारही रोड टायर जाळून चक्का जाम करण्यात आला तर कुर्डुवाडी कडून, वैराग मार्ग सोलापूर रोड चक्का जाम करण्यात आला असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे प्रभावित होऊन ठप्प झाली आहे.

रणदिवे वाडी, उपळाई खु, उपळाई बु येथे टायर जाळून रस्ता जाम करण्यात आला तर उंदरगाव येथे भजन कीर्तन या विधायक मार्गाने दोन तास रस्ता रोको केला.

माढा शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँका ओस पडल्या असून सुरक्षतेच्या पार्श्वभूमीवर दार बंद करून कर्मचारी वर्ग आत काम करीत आहेत तर सबरजिस्टार कार्यालय बंद करून कर्मचारीवर्ग बाहेर बसले आहेत. तहसील कार्यालयही ओस पडले आहे. अशा प्रकारे अनेक शासकीय सेवा या आंदोलनाने प्रभावित झाल्या आहेत.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी शंभू साठे, अमर गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नागनाथ घाडगे, दिनेश जगदाळे, युवराज जगदाळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस सहा निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून पेट्रोलिंग करून आजूबाजूच्या खेडेगावातील परिस्थिती नियंत्रणात ठेवत आहेत.

“मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन चक्का जाम करून शांततेच्या मार्गाने चालू आहे. एस टी सेवाबरोबरच खासगी सेवाही बंद आहे. अत्यावश्यक सेवा अॅम्ब्युलन्स सेवा सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत’.- सदाशिव पडदुणे, तहसीलदार माढा