
सामना ऑनलाईन । रियाध
सौदी अरेबिया आणि कॅनडात सध्या जोरदार राडा सुरू आहे. प्रकरण एवढं गंभीर आहे की सौदीने कॅनडातील आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. तर कॅनडानेही आपल्या राजदूतांना परत येण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर दोन्ही देशांनी आपसातील सर्व व्यवहारही बंद केले आहेत. दोन्ही देशातील सरकारने विद्यार्थी व रुग्णांनाही देशात परत बोलावले आहे. यामागे कुठलेही मोठे कारण नसून फक्त एक ‘बाई’ आणि एक ‘टि्वट’ असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी अॅमनेस्टी इंटरनॅशनलने एक माहिती प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी सौदी सरकारकडून काही महिला मानवधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचे म्हटले होते. यात समर बादवी या महिला कार्यकर्त्याचा समावेश असून ती प्रसिद्ध ब्लॉगर राएफ बादवी याची बहिण असल्याचे सांगण्यात आले होते. राएफ २०१२ पासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात आहे. तो तुरुंगात गेल्यानंतर २०१५ साली राएफची पत्नी तीन वर्षाच्या मुलाला घेऊन क्युबेकला निघून गेली. त्यानंतर तिला कॅनेडीयन नागरिकत्व मिळाले. त्यामुळे कॅनडा सरकारला बादवी कुटुंबाबद्दल विशेष आस्था आहे.
यामुळे अॅमनेस्टी इंटरनॅशनलने जेव्हा समर बादवीला सौदीने तुरुंगात टाकल्याची माहिती दिली. तेव्हा कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री क्रिस्टीया फ्रिलँड यांनी एक ट्वीट केलं. ज्यात समर बादवी यांच्या अटकेमुळे आपण चिंतेत आहोत. अशा कठिण प्रसंगी आम्ही बादवी यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि राएफ व समरच्या सुटकेची मागणी करत असल्याचं फ्रिलँड यांनी म्हटलं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अजून एक टि्वट केलं. त्यात त्यांनी समर बादवी यांना तात्काळ सोडण्याची मागणी केली. कॅनडाचे हे समर प्रेम सौदी सरकारला चांगलेच झोंबले. त्यांनी लागलीच कॅनडा सरकारला प्रत्युत्तर देणारं ट्वीट केलं. त्यात सौदीच्या अंतर्गत प्रकरणात कॅनडा ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला. सौदीच्या या आरोपामुळे कॅनडा सरकारची सटकली व त्यांनी सौदीतील राजदूत, तिथे उपचारासाठी गेलेले रुग्ण, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश दिले. तसेच सौदीबरोबरचे सर्व व्यवहारही कॅनडाने बंद केले आहेत. यात विमानसेवेचाही समावेश आहे.
समर बादवी या सौदी अरेबियात सातत्याने महिलांच्या अधिकारांसाठी काम करत आहेत. समर यांचे एका तरुणावर प्रेम असून त्यांना त्याच्याशी निकाह करायचा होता. पण त्यांच्या वडिलांचा यास विरोध होता. यामुळे समरने आपल्या वडिलांविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर जन्मदात्या पित्याबरोबर बंड केल्याच्या आरोपाखाली तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सौदीत महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळवून देण्यात समरची मोठी भूमिका आहे. २०१२ साली समरला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने ‘इंटरनॅशनल वूमेन ऑफ करेज’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.



























































