
सामना प्रतिनिधी । नांदेड
मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनामुळे मराठवाड्यातील रेल्वे सेवांवर चांगलाच परिणाम जाणवला. तपोवन एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलकांनी थांबविल्याने प्रवाशांचे बेहाल झाले. यामुळे रेल्वे प्रशासनाला काही गाड्या पूर्ण तर काही गाड्या अंशतः रद्द कराव्या लागल्या.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या बंदचा फटका रेल्वेलाही बसला. नांदेड ते पूर्णा, पूर्णा ते परभणी या मार्गावर आज तपोवन एक्सप्रेस तीन तास थांबविण्यात आली तर नगरसोल ते नरसापूर एक्सप्रेस आणि अमृतसर ते नांदेड ही सचखंड एक्सप्रेस संभाजीनगर रेल्वेस्थानकावर जवळपास तीन तास थांबविण्यात आली. यामुळे हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. अमरावती ते तिरुपती एक्सप्रेस ही चुडावा-नांदेड दरम्यान जवळपास दोन तास थांबविण्यात आली. नांदेड ते पूर्णा व पूर्णा ते परभणी या मार्गावर अनेक पॅसेंजर गाड्यांना तसेच परभणी ते परळी या मार्गावर देखील आंदोलक रेल्वे मार्गावर उतरल्याने त्याचा जबर फटका प्रवाशांना बसला. यामुळे आज परळी ते अकोला, अकोला ते पूर्णा व नांदेड ते परभणी या तीन रेल्वेगाड्या पूर्णतः रद्द कराव्या लागल्या. तर आदिलाबाद ते परळी ही गाडी पूर्णा-परळी दरम्यान रद्द करण्यात आली. नगरसोल ते नांदेड ही सवारी गाडी परभणी ते नांदेड या दरम्यान रद्द करण्यात आली. मनमाड ते काचिगुडा ही रेल्वेगाडी परभणी ते काचीगुडा रद्द करण्यात आली आहे. काचीगुडा-मनमाड ही गाडी नांदेड ते मनमाड या दरम्यान रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल रेल्वे विभागाने दिलगिरी व्यक्त केली असून, आंदोलकांनी रेल्वे ही आपली संपत्ती आहे असे समजून संयम बाळगावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
































































