
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
आदर्श शिक्षक निवडीची पारंपारिक पद्धत बाजूला ठेऊन रत्नागिरी नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने नवा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थीच गुणवत्ताधारक शिक्षकाची निवड करणार आहेत. शिक्षकांनी वर्गात काय शिकवले याचं उत्तर विद्यार्थी वर्गाकडून मिळणार असून महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीच्या वशिलेबाजीला आळा बसणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी सुधाकर मुरकूटे यांनी हि नवी संकल्पना मांडली आहे. नव्या संकल्पनेमुळे शिक्षकांच्या शिक्षण पध्दतीची खरी कसोटी लागणार आहे.शिक्षकांच्या शैक्षणिक पदव्यांपेक्षा,त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक प्रकल्पांपेक्षा वर्गातील ज्ञानदानावर शिक्षकांची कसोटी ठरणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या २१ शाळा आहेत. गेल्या दोन महिन्यात ३१ जुलै पर्यंत शिक्षकांनी वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांची एक लेखी आणि व्यक्तीमत्व परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा २५ गुणांची असून संपुर्ण वर्गात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करुन सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या वर्गातील शिक्षकाला गुणवत्ताधारक शिक्षक हा पुरस्कार मिळणार आहे. पहिली ते आठवी मधून दोन गुणवत्ताधारक शिक्षकांची निवड होणार आहे. त्याचबरोबर त्या परीक्षेत संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेलेल्या गुणांची बेरीज करण्यात येणार आहे. सर्वाधिक गुण मिळविणारी शाळा गुणवत्ताधारक शाळा ठरणार आहे.
आदर्श या नावाला बगल देत गुणवत्ताधारक हा शब्द वापरण्यात आला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतून प्रत्येक इयत्तेतून सर्वाेधिक गुण मिळविणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना गुणवत्तादूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांना आठ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे गुणवत्ताधारक शाळा आणि शिक्षकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.




























































