‘शकुंतला’ आजही पारतंत्र्यातच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिल कुचे

अमरावती जिह्यात ब्रिटिश कालावधीपासून सुरू असलेली शकुंतला रेल्वे अजूनही जुन्या स्थितीत आहे. विसाव्या शतकात वऱ्हाडात वाहतुकीची साधने नव्हती. त्या काळात गावागावांना बाहेरच्या जगाशी जोडण्यासाठी शकुंतला रेल्वे वऱ्हाडला आणली गेली. अमरावती जिह्यातील अचलपूर येथून २५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली शकुंतला शेवटची घटका मोजत आहे, परंतु आता शकुंतलेकडे अकोला, यवतमाळ, अमरावती व वाशीमच्या खासदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे शकुंतलेचा वनवास संपणार असे आता कागदपत्रावरून तरी दिसून येत आहे. वऱहाडात होणारा मुबलक कापूस, संत्री तसेच अचलपूर येथील विदर्भ मिलमध्ये तयार होणाऱया कापसाच्या गाठी आणि मेळघाटातील वनसंपदा इंग्लंडमध्ये नेण्याच्या दृष्टीनेच शकुंतला सुरू करण्याचा निर्णय त्या काळात ब्रिटिशांनी घेतला होता. त्यासाठी क्लिक निक्सन कंपनीला शकुंतला रेल्वे चालविण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यामुळे या रेल्वेपासून येणारे उत्पन्न निक्सन कंपनीलाच मिळत होते. शकुंतला ज्या रुळावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे आहेत. हिंदुस्थानी रेल्वे या कंपनीला दरवर्षी रॉयल्टी म्हणून १ कोटी रुपयांची रक्कम देत असे.

अचलपूर ७७ किमी, मूर्तिजापूर ७७ किमी व तिथून यवतमाळ ११३ किमी असा ‘शकुंतला’ रेल्वेचा प्रवास मार्ग सुरू झाला. १९४७ मध्ये हिंदुस्थान स्वतंत्र झाला होता, मात्र शकुंतला २०१३ पर्यंत पारतंत्र्यातच होती. मीटर गेजमध्ये सुरू असलेली शकुंतला स्वतंत्र कधी होईल याचीच वाट पाहण्यात येत होती. तांत्रिक अडचणीत शकुंतला ही क्लिक निक्सन कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे या रेल्वेवर हिंदुस्थान रेल्वे आपला अधिकार सांगू शकत नव्हती. काँग्रेसच्या काळात ही रेल्वेलाइन ब्रॉडगेज करण्यासाठी प्रयत्न झालेत. मात्र खासदार सुदाम देशमुख वगळता कुणीही प्रयत्न केले नाहीत. २०१३ मध्ये निक्सन कंपनीचा करार संपुष्टात आल्यामुळे आता हिंदुस्थानी रेल्वे विभागाकडे ‘शकुंतले’ची धुरा आली आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी ‘शकुंतला’ रेल्वेला नवसंजीवनी देत ब्रॉडगेज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. यासोबतच खासदार भावना गवळी, खासदार रामदास तडस, खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना शकुंतला रेल्वेलाइन ब्रॉडगेज करण्यासाठी सर्व बाबी पूर्ण झाल्याची माहिती दिली. ब्रॉडगेज रेल्वेलाइन तयार करण्यासाठी २१४७.४४ कोटी रुपये लागणार असून त्यापैकी अर्धी रक्कम महाराष्ट्र सरकार देण्यास तयार आहे. त्यामुळे शकुंतलेचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.