
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो’चा २०१६ अहवाल जाहीर झाला आहे. भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे, असे नमूद करतानाच तो अहवाल पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे उघडायला हवेत, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.
दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा विषय कोणी काढला की मोदी हे अनेकांना नीट माहिती घ्या, वस्तुस्थिती जाणून घ्या, आकडेवारी तपासा असे सांगून स्वतःची सुटका करून घेत असतात, पण भाजपशासित राज्यांत काय चालले आहे ते मोदी यांनीच नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरोच्या अहवालातून जाणून घ्यावे, असे राहुल यांनी म्हटले आहे.
मोदी यांची मानसिकताच ‘दलितविरोधी’ असून दलितांचा सफाया हेच भाजपचे आणि त्यांच्या सरकारचे धोरण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी काल-परवाच केला होता. आता त्यांनी भाजपशासित राज्यांतील वाढत्या दलित अत्याचारांची आकडेवारी सांगणारा तो सरकारी अहवालच आपल्या पोस्टसोबत ‘ट्विटर’वर टॅग केला आहे.

























































