पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासून शिवमंदिर गजबजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील पुरातन मंदिरात सोमवारपासून ‘शिव शंभो’चा गजर घुमणार असून भाविकांच्या गर्दीने ही मंदिरे गजबजणार आहेत. श्रावणातल्या सोमवारी व शनिवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापकांनी जय्यत तयारी केली आहे.

संगमेश्वर तालुक्यात पुरातन मंदिरांचा ऐतिहासिक ठेवा आहे. उत्तम काष्ठकला असलेले राजवाडी येथील सोमेश्वर मंदिर, पुरातन कर्णेश्वर मंदिर, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले सप्तेश्वर मंदिर, रामेश्वर पंचायतन मंदिर, प्रसिद्ध मार्लेश्वरसह तालुक्यातील अनेक प्रसिद्ध शिवमंदिरांतून शिव शंभोचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत असतात.

येथील प्रसिद्ध सप्तेश्वर मंदिर हे निसर्गाच्या सान्निध्यात असून येथे असणारी सात तळी श्रावण महिन्यात पूर्ण भरून वाहतात. तसेच येथील मोठ्या तळ्यात भक्तगण मोठ्या भक्तिभावाने स्नान करतात. निसर्गाच्या सान्निध्यात सलेल्या या मंदिरात जाण्यासाठी सुंदर निसर्गातून सफर करीत जावे लागते. कसबा येथील सुंदर नक्षी व ऐतिहासिक वारसा व कर्णराजाने बांधलेल्या कर्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. तसेच सुंदर काष्ठकला असलेल्या व गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. भक्तगणांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्व ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रामेश्वर पंचायतन मंदिरात दोन वर्षांपासून भाविकांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे मंदिर प्रकाशझोतात येत असून याही ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने श्रावण सोमवारी दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.