कोकणात सर्वत्र पसरले भातशेतीचे हिरवे गालिचे !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  संगमेश्वर

कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या – खाड्या आणि अथांग समुद्र ! कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे, हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच! सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते . डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. गढूळ पाण्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पाश्वर्भूमीवर उनपावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं.

राज्याच्या विविध भागात पडणाऱ्या पावसाची दरवर्षीची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येते कोकण पावसाच्या सरासरीत दरवर्षी आघाडीवर असते. यावर्षीही कोकणात राज्यातील अन्य भागाच्या  तुलनेत पाऊस उत्तम झाला असून शेती चांगलीच बहरली आहे. पावसाने पेरणीपासून आता भात फुलोऱ्याला येइपर्यंत शेतकऱ्यांना चांगली साथ दिली आहे. कोकणचे सौंदर्य हे खरंतर पावसावरच अवलंबून असतं. दरवर्षी वरुणराजा कोकणचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यात चारही महिन्यात कोकणचा निसर्ग आपलं रुपडं टप्याटप्याने पालटत असतो. कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि आश्विन महिन्यातच.

श्रावणात कोकणची माळराने रानफुलांनी बहरुन येतात. विविधरंगी आणि आकाराची ही रानफुले म्हणजे अभ्यासकांना एक पर्वणीच असते. पाऊस थोडा कमी होऊन उनाची तिरीप आली, की ही रानफुले हिरव्या माळरानावर वाऱ्यासंगे डोलू लागतात. निसर्गातील हे चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे कोकणवासीयांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते. कोकणचं पर्यटन हे शांत आणि सुरक्षित असल्याने नेहमीच समृद्ध समजले जाते. कोकणात येणारे पर्यटक स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकले, की पर्यटनस्थळे बदनाम होणार नाहीत हे पर्यटकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सध्या मात्र ही हिरवाई कोकणच्या सौंदर्यात भर घालत आहेत यात शंका नाही.