करन्सी नोट प्रेसमध्ये आता इंटेग्लिओ प्रिंटिंगसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित नवे यंत्र उपलब्ध झाले आहे, त्याचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. सद्यस्थितीत आशिया खंडात केवळ नाशिकच्या या प्रेसमध्येच हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये नुकताच हा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादीतच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती पी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू हे उपस्थित होते.

संगणकाद्वारे अत्याधुनिक पद्धतीने इंटेग्लिओ प्रिंटिंगसाठी प्लेट बनविण्याचे तंत्रज्ञान नव्या यंत्रणेमुळे उपलब्ध झाले आहे. ही प्रणाली देशातील मुद्रण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षिततेत अधिक भर घालणारी आहे. यावेळी सचिव गर्ग यांनी नोट प्रेसमधील विविध उत्पादन विभागांना भेट देवून मुद्रण यंत्रांची माहिती घेतली. नोट छपाईच्या तंत्राचे बारकाईने निरीक्षण केले. सुरक्षा मानकांचीही माहिती जाणून घेतली. महामंडळाच्या अध्यक्षा तृप्ती घोष यांनी नोट प्रेसच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. करन्सी नोट प्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.