
उदय जोशी | बीड
अडीच महिन्याचा कालावधी उलटूनही बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला पावसाने दगा दिला आहे. संपूर्ण खरिप हंगाम संकटात सापडला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून चार्याचा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात पाणी प्रश्नही पेटू शकतो. या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडे अद्याप पर्यंत कुठलेच नियोजन नाही परतीच्या पावसावर सरकार आणी प्रशासन भिस्त ठेऊन आहे.
एकीकडे काही राज्याला पावसाने अक्षरशः धुतले असतांना महाराष्ट्रातील मराठवाड्यात मात्र दुष्काळाचे संकेत मिळू लागले आहेत, अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप पावसाच्या सरासरीने दीडशे चा ही टप्पा गाठला नाही, पावसाने दगा दिल्याने खरीप हंगाम उध्वस्त होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत, कमी दिवसाची पिकं हातची जात आहेत, अद्याप धरणामध्ये पाण्याचा नवा थेंब पोहोचला नाही, नदी नाले कोरडी पडली आहेत. बहुतांश मोठे प्रकल्प जोत्याखाली गेली आहेत तर लघु प्रकल्पाचा तळ दिसू लागला आहे. पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे, भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने काहीच उपाययोजना केलेली नाही.
पाऊस नसला तरी आपल्याकडे परतीचा पाऊस निश्चित येईल या भरवशावर प्रशासन ढिम्म झाले आहे, नक्की परतीचा पाऊस चित्र बदलेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी सरकारला मात्र परतीच्या पावसावर भरोसा आहे म्हणूनच अद्याप प्रशासानाने धरणातील पाणी साठा आरक्षित केला नाही किंवा कुठल्याही उपाययोजना राबवल्या जात नाहीत.































































