
सामना ऑनलाईन, कोलकाता
दिग्गज कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी कोलकाता येथील एका खासगीरुग्णालयात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या विकाराने गेले काही दिवस त्रस्त असलेल्या चॅटर्जी यांच्यावर उपचार सुरू होते. त्यात सकाळी 8.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन कन्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तीक्र दुःख व्यक्त केले आहे.
गेल्या महिन्यात चॅटर्जी यांना ‘हॅमरेजिक स्ट्रोक’मुळे 40 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र तीनच दिवसांनी गेल्या मंगळवारी प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नव्हती. अखेर त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते.
10 वेळा खासदार
सोमनाथ चटर्जी हे 1971 पासून पश्चिम बंगालमधून तब्बल 10 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 1968 पासून सुरू झालेल्या आपल्या राजकीय जीवनात पराभव त्यांच्या वाटय़ाला एकदाच आला होता. 1984 सालात जादवपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याकडून ते पराभूत झाले होते.
सोमनाथ चटर्जी हे भारतीय हिंदू महासभेचे संस्थापक सदस्य असलेले प्रख्यात वकील निर्मलचंद्र चटर्जी यांचे सुपुत्र होत. मात्र सोमनाथ चटर्जी यांच्या राजकीय जीवनाचा प्रारंभ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापासून 1968 सालात झाला. तेव्हापासून 2008 सालापर्यंत म्हणजे 40 वर्षे ते माकपमध्ये होते.
पक्षातून हकालपट्टी
हिंदुस्थान-अमेरिका यांच्यातील अणुकराराच्या मुद्यावरून 2008 सालात माकपने केंद्रातील डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. सोमनाथ चटर्जी हे त्यावेळी लोकसभा अध्यक्ष होते. पक्षाने त्यांना ते पद सोडण्याचा आदेश दिला होता. पण त्यांनी तो आदेश धुडकावून लावल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
सोमनाथ चटर्जी हे राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज नेते होते. त्यांनी संसदीय लोकशाही समृद्ध केली. गरीबांच्या उत्थानासाठी त्यांनी सतत आवाज उठवला-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सोमनाथ चटर्जी हे व्यक्ती नव्हे संस्थान होते. सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचा कायम आदर आणि सन्मान केला- राहुल गांधी,अध्यक्ष, काँग्रेस
पार्थिवाचे रुग्णालयाला दान
आज ‘अवयवदान दिवस’ साजरा होत असतानाच बुजुर्ग कम्युनिस्ट नेते सोमनाथ चॅटर्जी यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय चिकित्सेसाठी एसएसकेएम रुग्णालयाला दान केले. चॅटर्जी यांनीच देहदानाची इच्छा व्यक्त केली होती.




























































