
सामना ऑनलाईन । उत्तराखंड
स्वयंवर ही संकल्पना तशी नवीन नाही. अगदी पुराणकाळापासून हिंदुस्थानात स्वयंवर होत आली आहेत. पण, आजवरच्या स्वयंवरामध्ये माणसांचा समावेश होता. मात्र, उत्तराखंडमध्ये चक्क शेळीचे स्वयंवर आयोजित करण्यात आलं आहे.
उत्तराखंड येथील तिहेरी गावात हा विवाह सोहळा संपन्न होणार असून यासाठी पाच शेळ्यांची निवड करण्यात आली आहे. या शेळ्या स्वतःसाठी बोकड नवरा निवडणार आहेत. या शेळ्यांसमोर अनेक बोकड उभे करण्यात येतील. शेळी ज्या बोकडाच्या शेजारी जाऊन उभी राहील, तिचा त्या बोकडाशी विवाह लावण्यात येईल.
गंमत म्हणजे, माणसांच्या लग्नातल्या विधींप्रमाणेच या विवाहाचे विधी पार पडणार आहेत. हळद, संगीत अशा सोहळे विधीवत साजरे केले जाणार आहेत. नवरा-नवरीला कपडे आणि दागिन्यांनी सजवण्यात येणार आहे. तसंच विवाह विधींमधला महत्त्वाचा मानला गेलेला कन्यादान हा विधीही होणार आहे. या लग्नाला पशुपालन विभागाचे अधिकारीही उपस्थिती लावणार असून या शेळ्यांना आहेरही देण्यात येणार आहे. या अजब आणि अनोख्या विवाहसोहळ्याला आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. पाऊस पडण्यासाठी बेडकांचे विवाह सोहळे लावण्याची प्रथा आहे. मात्र, या शेळी स्वयंवरामागे नेमका काय हेतू आहे, हे कळू शकलेलं नाही.























































