पत्‍नीने कु-हाडीने केला दारूडया नव-याचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

येथील मोहीनी राजनगर येथे दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने त्याची कुऱ्हाडीने घाव करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मयताच्‍या भावाने दिलेल्‍या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीसांत गुन्‍हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्‍नीस अटक करण्यात आली आहे. रघुनाथ लहानू गायकवाड (४८) असे मृताचे नाव आहे.

सोमवारी १३ ऑगस्‍ट रात्री ९ ते १० वाजेच्‍या सुमारास रघुनाथ व त्याची पत्नी शांताबाई यांच्‍यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी शांताबाईने रागाच्या भरात जवळच पडलेली कु-हाड उचलली व रघुनाथवर घाव घातला. यात रघुनाथचा जागीच मृत्यू झाला. आरोपी शांताबाईने मयत रघुनाथचा मृतदेह घरापासुन लांब २५ फुट ओढत नेऊन त्‍यास कपडयाखाली झाकुन ठेवला. शांताबाईचा मुलगा बाळासाहेब हा रात्री ११.३० वाजता कामावरून घरी आल्‍यावर त्‍याने आईला शांताबाईला वडील कोठे आहे अशी विचारणा केली असता तीने तुझे वडील दारू पिऊन माझ्याशी भांडले केले. त्‍यामुळे ते आता लांब झोपले आहेत. त्‍यांना उठवू नको असे सांगितले. मात्र सकाळ झाली तरी आपले वडील का उठले नाहीत हा प्रश्न बाळासाहेबाच्‍या मानात आला. त्‍यानंतर त्‍याने पाहिले असता वडील मयत झाल्‍याचे त्‍याच्‍या लक्षात आले.

त्यानंतर रघुनाथचा भाऊ बाळासाहेब लहानु गायकवाड (५५) यांनी कोपरगाव शहर पोलिसांत याबद्दल तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शांताबाई यांच्‍या विरोधात कलम ३०२ , २०१ अन्‍वये गुन्‍हा दाखल केला असून आरोपी शांताबाईस अटक केली आहे. दरम्‍यान घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवतारे यांनी भेट देऊन माहिती घेऊन निर्देश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.

summary – wife killed husband in Kopargaon