
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात सरकारच्या योजना कशा यशस्वी झाल्या याचे अनेक दावे केले. मात्र हे दावे करताना मोदींनी थोडीफार हेराफेरी केल्याचे समोर आले आहे. मोदींनी वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने ‘स्वच्छ भारत’ मोहीमेबाबतच्या अहवालाविषयी सांगताना जी आकडेवारी सादर केली आहे ती चुकीची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणावरून टीका करणाऱ्या विरोधकांच्या हातात आता आयते कोलीत मिळाले आहे.
लाल किल्ल्यावरून मोदींचे निवडणुकीचे भाषण!
‘हिंदुस्थानात २०१४ साली आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली तेव्हा आमची मस्करी केली गेली. मात्र अस्वच्छतेमुळे तीन लाख बालकांचे मृत्यू होत होते ते आता थांबले असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या अहवालात म्हटले आहे’, असा दावा मोदींनी भाषणात केला होता. मात्र वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या अहावालातील मुद्दे सांगताना मोदींनी थोडाफार बदल केल्याचे समोर आले आहे.
मोदींनी लाल किल्ल्यावरील आपल्या ‘अखेरच्या भाषणात’ तरी खरं बोलायचं !
वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अहवालात मोदींच्या स्वच्छता मोहीमेची स्तुती केली होती. ‘जर ही मोहीम अशीच सुरू राहिली आणि ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश १०० टक्के हागणदारी मुक्त झाला तर अस्वच्छतेमुळे होणारे तीन लाख मुलांचे मृत्यू रोखता येऊ शकतात’, असे नमूद केलेले आहे.
summary : PM Modi misquotes WHO report on Swachh Bharat Mission


























































